For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदूषणाच्या नावावर मूर्तिकारांवरील निर्बंध हटवा

11:35 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रदूषणाच्या नावावर मूर्तिकारांवरील निर्बंध हटवा
Advertisement

बेळगाव मूर्तिकार संघटनेचे पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पीओपी मूर्ती विघटनाची पुणे महापालिकेची योजना राबविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : प्रशासनाकडून पीओपी गणेशमूर्तींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाडू मिळणे कठीण झाले आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सोय असून यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे मूर्तिकारांवर निर्बंध घालण्यात येऊ नयेत. प्र्रशासनाने पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पीओपी मूर्तीचे विघटन करण्याचा उपक्रम राबवावा, अशा मागणीचे निवेदन बेळगाव मूर्तिकार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. पीओपी गणेशमूर्तींमुळे पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाकडून पीओपी गणेशमूर्ती बनविनाऱ्या मूर्तिकारांवर निर्बंध घातले जात आहेत. त्यामुळे मूर्तिकारांसमोर संभ्रमावस्था निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी मूर्तिकारांकडून करण्यात आली आहे. शहरामध्ये शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

मागणीत प्रचंड वाढ 

Advertisement

यापूर्वी शाडूच्या मूर्ती बनविल्या जात होत्या. सध्या शाडू मिळणे अशक्य झाले आहे. शाडूच्या मूर्ती अत्यंत नाजुक असल्यामुळे तडे जाण्याची शक्यता अधिक असते. यातच गणेशमूर्तींच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मूर्तिकारांना पीओपीचा आधार घ्यावा लागला आहे. सदर गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्याने प्रशासनाकडून निर्बंध घातले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून विसर्जन केलेल्या पीओपी मूर्तींचे विघटन करून ते पुन्हा रासायनिक खत म्हणून पुनर्वापर करण्याची योजना राबविली जात आहे. त्याप्रमाणेच बेळगावमध्येही अशी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी मूर्तिकारांकडून करण्यात आली.

प्रशासनाचे सहकार्य आवश्यक

प्रशासनाने याचा पाठपुरावा करून मूर्तिकारांना सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर, कपिलतीर्थ, जक्कीनहोंडा या तलावांमध्ये सोय करण्यात आली आहे. याबरोबरच महानगरपालिकेकडून प्रदूषण टाळण्यासाठी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी मूर्तिकार संघटनेकडून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोर समस्या मांडल्या. दरम्यान, पालकमंत्र्यांनी यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सागर पाटील, सतीश गौरगोंडा, बाळू जोशी, आनंद आपटेकर आदी उपस्थित हेते.

Advertisement
Tags :

.