For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

खासदार अनंतकुमार हेगडे यांना कारवार मतदारसंघातून तडीपार करा

10:24 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासदार अनंतकुमार हेगडे यांना कारवार मतदारसंघातून तडीपार करा

दलित महामंडळातर्फे तहसीलदारांना निवेदन

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी अलीकडे वेळोवेळी संविधानविरोधी तसेच मागासवर्गीयांच्या विरोधात, महिलांच्या विरोधात जहरी वक्तव्य केले आहे. भाजप जर राज्यसभेत पूर्ण बहुमताने आल्यास निश्चितच संविधान बदलू, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आम्ही दलित महामंडळाच्यावतीने तीव्र निषेध करत आहोत. असा ठराव करून त्यांना कारवार मतदारसंघातून तडीपार करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले. गायकवाड यांनी हे निवेदन गृहमंत्र्यांना पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी दलित महासंघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मादार म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून कारवार मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्यासाठी काहीही केलेले नाही. अलीकडे तालुक्यात दौरे करून आपल्या वक्तव्याने तालुक्यातील वातावरण गढूळ करत आहेत. तसेच संविधानाचा अवमान करून संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. तसेच मागासवर्गीयांच्या विरोधात  वक्तव्य करत आरक्षणाबाबत कठोर भूमिका घेऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे कर्नाटकातील संपूर्ण दलित समाज दुखावला गेला असून पुन्हा असे वक्तव्य केल्यास राज्यभर त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.  गृहमंत्र्यांनी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. असे ते म्हणाले. यावेळी दलित महामंडळाचे सुरेश शिंगे, राम मादार, संतोष चित्तळे, मनोहर मादार, यल्लाप्पा कोलकार, शरद होन्ननायक, आदित्य मादार, गंगुबाई मादार, निंगाप्पा होसूरकर, प्रकाश मादार, पांडू गुरन्नावर, उमेश कोलकार यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.