राष्ट्रीय महामार्गावरील कचऱ्याचे ढिगारे हटवा
खासदार विश्वेश्वर हेगडेंना निवेदन
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार तालुक्यातील माजाळी ते भटकळ तालुक्यातील गोरटे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या दोन्ही बाजूनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. हा महामार्ग कचरा ढिगारे आणि घाण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्याची सूचना करावी, अशी मागणी येथील पहरे मंचने कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी हेगडे हे कारवारच्या दौऱ्यावर आले असता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, पहरे मंचने गेल्या काही वर्षांपासून कारवार आणि अंकोला तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेला वाहून घेतले आहे. राष्ट्रीय हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण फेकली जाते. कचरा टाकलेल्या जागेची मंचने स्वच्छता केली तरी पुन्हा कचऱ्याच्या ढिगांची निर्मिती होत असते.
त्यात वस्तू रस्त्याच्या बाजूला फेकल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करुन रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता तर विद्रुप होत आहेच. शिवाय घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यापर्यंत चुकीचा संदेश जात आहे आणि प्रवाशांना दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची दखल घेऊन विल्हेवाट लावणे राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरणाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. रस्त्याच्या बाजूला नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी फलक लावण्याची प्राधिकारची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. रस्त्याच्या बाजूला सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याची आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना हमरस्ता प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याची मागणी मंचतर्फे खासदार हेगडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी मंचचे वकील नागराज नायक, पत्रकार टी. बी. हरिकंत्र, वसंत भट, विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर आदी उपस्थित होते.