यळेबैल-राकसकोप रस्त्याशेजारील धोकादायक झाडे हटवा
वनाधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची आवश्यकता
किणये : यळेबैल-राकसकोप रस्त्याच्या बाजूला धोकादायक झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या व झाडे कधीही कोसळून पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडण्याआधी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची पाहणी करून धोकादायक झाडे व फांद्या हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मागील महिन्यात बेळगुंदी स्मशानभूमीजवळ दुचाकीवर झाड कोसळून कर्ले गावातील दोन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. यानंतर स्मशानभूमीजवळ धोकादायक झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या. याचबरोबर बिजगर्णी रस्त्यावर तसेच बेळगुंदी-राकसकोप रस्त्यावर अजूनही धोकादायक झाडे आहेत.
यळेबैल, राकसकोप या रस्त्याच्या बाजूला हायस्कूलजवळ धोकादायक झाडे आहेत. यांच्या फांद्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणाहून वाहनधारक तसेच विद्यार्थी वर्गाची रोज वर्दळ असते. तसेच राकसकोप गावाजवळही काही झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी वनखात्याने दक्षता घेण्याची गरज आहे. राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, इनाम बडस व पश्चिम भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. वाहनधारकांच्या सुरक्षेचा व स्थानिक नागरिक व विद्यार्थी यांचा विचार करून ही धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.