For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती हटवा

10:23 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती हटवा
Advertisement

सर्व्हे करून संबंधितांना सूचना करण्याची मागणी : मनपाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात धोका

Advertisement

बेळगाव : आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात हेणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना त्याबाबत नोटीस दिली पाहिजे. कारण अशा धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी बरोबरच शेजारी असलेल्या मालमत्तांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खडेबाजारसह इतर परिसरात धोकादायक इमारती असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. मात्र महानगरपालिकेने आतापर्यंत तरी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा तातडीने सर्व्हे करून धोकादायक इमारती हटवाव्यात, अशी मागणी होत आहे. शहरामध्ये सध्या धोकादायक इमारती किती आहेत? याची माहिती महानगरपालिकेकडे घेण्यासाठी गेले असता शहरातील धोकादायक इमारतींची नोंद महापालिका प्रशासनाकडे नसल्याचे उघडकीस आले आहे. धोकादायक इमारती रहिवाशांसह अन्य नागरिकांना जीवघेण्या ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच अनेक धोकादायक इमारती आहेत. मात्र त्या धोकादायक इमारती मालक हटविण्यास तयार नाहीत तर काही इमारतींचा वाद न्यायालयात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पावसाळ्यापूवीं धोकादायक इमारतींचा सर्व्हे करावा आणि संबंधितांना नोटीस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे.

कोणत्याहीक्षणी कोसळण्याचा धोका

Advertisement

महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य जुन्या इमारती आहेत. सदर इमारती पाववसाळ्यात कोणत्याहीक्षणी कोसळण्याचा धोका आहे. मात्र अशा धोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. अनेकवेळा धोकादायक इमारती कोसळून काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. पण याचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नाही. अशा इमारतींची नोंद ठेवण्याबाबत महापालिका प्रशासन उदासिन असल्याचे दिसत आहे.

धोकादायक इमारतीशेजारी राहणाऱ्या रहिवाशांची पंचायत

यापूर्वी अनेकवेळा धोकादायक इमारती हटविण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. पण महापालिका याबाबत कोणतीच कारवाई करीत नाही, अशा तक्रारी धोकादायक इमारतीच्या शेजारी असणाऱ्या नागरिकांनी केली आहे. त्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने धोकादायक इमारतीशेजारी राहणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरुन जगावे लागत आहे. मात्र धोकादायक इमारतींबाबत महानगरपालिका प्रशासनाला कोणतेच सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी या पावसाळ्यात जर पाऊस अधिक झाला तर अशा धोकादायक इमारती कोसळून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पावसाळ्यापूर्वी याचा सर्व्हे करावा, अशी मागणी होत आहे.

दखल घेण्याची आवश्यकता

मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे काही इमारती बचावल्या आहेत. मात्र आता अत्यंत जीर्ण झालेली जुनी घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. इतर नागरिकांना याचा धोका होऊ नये याची दखल घ्यावी. अशा प्रकारे धोकादायक इमारती हटविण्याबाबत नागरिकांनी आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. धोकादायक इमारती हटविल्यास पावसाळ्यात घडणारे अनर्थ टाळणे शक्य आहे. यासाठी महानगरपालिकेनेच आता तातडीने पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.