सर्व कॅसिनो गोव्यातून हटवा
‘कॅसिनो विरोधी पणजीकर’ सभेत ठराव संमत : गोव्याला देशाची : ‘कॅसिनो कॅपिटल’ करण्याचा डाव: सर्व नियम गुंडाळले, कॅसिनोंमुळे गुन्हेगारीत वाढ
पणजी : मांडवी नदीतील कॅसिनोविरोधात पणजीवासियांनी ‘एल्गार’ करुन दंड थोपटले असून नव्याने येणारा ‘मेगा कॅसिनो’रोखण्याबरोबरच मांडवीतील सर्व कॅसिनो केवळ पणजीतूनच नव्हे तर गोव्यातूनच हटवावे, अशी मागणी करणारा ठराव ‘कॅसिनो विरोधी पणजीकर’तर्फे आयोजित सभेत संमत करण्यात आला.पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये काल मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला. पणजीत मांडवी नदीत येऊ घातलेल्या ‘मेगा कॅसिनो’ला केंद्र सरकारने बंदी घालावी तसेच त्या कॅसिनोसाठी सध्या चालू असलेली सर्व कामे बंद करावीत, असेही ठरावात म्हटले आहे.
सर्व नियम गुंडाळले : ताम्हणकर
नव्याने येणारा मेगा कॅसिनो 120 कोटीचा असून तो 112 मीटर लांब आणि 27 मीटर रुंदीचा आहे. अगोदरच मांडवी नदीत कार्यरत असलेल्या कॅसिनोच्या बदली हा नवीन ‘मेगा कॅसिनो’ आणण्यात येत असून त्याची प्रवासी क्षमता 2000 एवढी आहे. अगोदरच्या कॅसिनोची क्षमता 300 असून असा जादा क्षमतेचा बदली कॅसिनो नियमानुसार आणता येत नाही. तरी देखील तो सर्व नियम गुंडाळून आणला जात असल्याची माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली.
बंदर कॅप्तानचाही होता विरोध
कॅसिनोप्रकरणी आपली याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. नव्याने येणाऱ्या मेगा कॅसिनोला सर्व प्रकारचे परवाने देण्यात आलेले आहेत. बंदर कप्तानने त्या मेगा कॅसिनोला विरोध केला तसेच त्या खात्याच्या सचिवांनी देखील त्यास आक्षेप घेतला. त्यासाठी त्यांनी विविध नियमांचा संदर्भ दिला आहे, असे असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून त्या कॅसिनोला हिरवा कंदील दर्शवल्याचे ताम्हणकर यांनी सभेत सांगितले. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करायचा असेल तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे, असेही ताम्हणकर यांनी नमूद केले. स्वाक्षरी मोहीम किंवा ठराव संमत करुन काहीच होणार नाही. न्यायालयातही कॅसिनोंचा विषय प्रलंबित आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
मोरजी, बांबोळी येथे कॅसिनो आणण्याचे प्रयत्न सुरू
मांडवीत जागा नसल्यामुळे आता गोव्यातील अंतर्गत भागात मोरजी, बांबोळी येथे कॅसिनो आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. गोवा हे देशाचे कॅसिनो कॅपिटल करण्याचा डाव असून तो उधळून लावला पाहिजे, असा इशारा विविध वक्त्यांनी दिला.
कॅसिनोमुळेच गुन्हेगारीत वाढ
कॅसिनोमुळेच गुन्हेगारी वाढली असून तेथे सर्व क्षेत्रातील माफीयांचे राज्य असते. बँकेत रु. 50 हजार भरण्यासाठी पॅन कार्ड सक्तीचे आहे परंतु कॅसिनोत लाखो, कोटी रुपयांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड लागत नाही. गोमंतकीयांना तेथे बंदी घातली असली तरी बाहेरचे लोक तेथे येतात. कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे बनल्याचे एका वक्त्याने सांगितले. गल्लीबोळात जुगार खेळल्यास पोलिस अटक व कारवाई करतात पण कॅसिनोतील जुगारावर कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती गोव्यासाठी धोकादायक असल्याचे वक्त्यांनी निदर्शनास आणले. ताम्हणकर यांच्यासह स्वप्नेश शेर्लेकर, आल्बर्टिना आल्मेदा, रुई परेरा, सबीना मार्टिन्स अशा विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सभेत भाषणे केली. पेट्रीसिया पिंटो यांनी ठराव मांडले आणि ते संमत झाले.