For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील हटाव मोहीम थंडावली, ब्लॅकस्पॉट वाढले!

10:21 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील हटाव मोहीम थंडावली  ब्लॅकस्पॉट वाढले
Advertisement

परिस्थिती जैसे थे : नागरिकांना नाहक त्रास : कचरा पेटवून देण्याचे प्रकार थांबवण्याची नितांत आवश्यकता

Advertisement

बेळगाव : शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा तीव्रगतीने राबविणे गरजेचे आहे. नुकताच गोडसेवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला. मात्र त्यानंतर इतर ठिकाणी असलेले ब्लॅकस्पॉट हटविणे गरजेचे आहे. या ब्लॅकस्पॉटमुळे कचऱ्याचे ढीग तसेच पडून आहेत. त्या ठिकाणी जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तेहा बऱ्याच ठिकाणी असलेले ब्लॅकस्पॉट तातडीने हटवावेत, अशी मागणी होत आहे. तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी ब्लॅकस्पॉट हटविण्याची मोहीम राबविली होती. ती मोहीम बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर ब्लॅकस्पॉट हटाव मोहीम थंडावली. 244 हून अधिक ब्लॅकस्पॉट शहरात होते. त्यामधील काही ठिकाणचे ब्लॅकस्पॉट हटविले होते. मात्र अजूनही बऱ्याच प्रमाणात ब्लॅकस्पॉट विविध ठिकाणी आहेत. त्यामध्ये पुन्हा वाढ होत आहे. तेव्हा याबाबत गांभीर्याने दखल घेऊन ब्लॅकस्पॉट हटवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

ब्लॅकस्पॉटमुळे परिसरात दुर्गंधी

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे आता उन्हाळा असून या ब्लॅकस्पॉटमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने ब्लॅकस्पॉट हटवावेत, अशी मागणी होत आहे. आठ दिवसांपूर्वी गोडसेवाडी येथील ब्लॅकस्पॉट हटविल्यानंतर इतर ठिकाणचेही ब्लॅकस्पॉट हटविले जातील, अशी आशा होती. मात्र याबाबत नगरसेवक तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येत आहे.

ब्लॅकस्पॉट निर्मूलनाचे आश्वासन

याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही बरेच ब्लॅकस्पॉट कमी केले आहेत. आणखी कोठे असतील तर ते कमी करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शहरामध्ये अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट असून त्याचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी, साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण यांना विचारले असता उत्तर भागातील सर्व ब्लॅकस्पॉट निर्मूलन केले आहेत, असे त्यांनी सांगितले. दक्षिण भागामध्ये कोठे असतील व इतर ठिकाणीही ब्लॅकस्पॉट असतील तर त्याचे निर्मूलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रात्रीच्यावेळी कचरा उचल करण्याची मोहीम थंडावली

तत्कालीन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पहाटेच्यावेळी कचरा उचल करण्याबरोबरच रात्रीच्यावेळीही घंटागाडी फिरवून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी निर्माण होणारे ब्लॅकस्पॉट कमी झाले होते. मात्र आता रात्रीच्यावेळी कचरा उचल करण्याची मोहीम थांबविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा ब्लॅकस्पॉट नव्याने निर्माण झाले आहेत. तेव्हा पूर्वीप्रमाणे दोनवेळा कचऱ्याची उचल झाली तरच ब्लॅकस्पॉट कमी होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांतून व्यक्त होत आहेत. नूतन आयुक्त पी. एन. लोकेश याकडे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.

कचरा पेटवून देण्याचे प्रकार थांबणे गरजेचे

शहरामध्ये काही ठिकाणी अजूनही कचरा पेटवून देण्यात येत आहे. अशा तक्रारी वाढल्या आहेत. गांधीनगर तसेच भाग्यनगर परिसरात कचरा पेटविला जात आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित होत असून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. तेव्हा कचरा पेटवून देण्याचे प्रकार थांबणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.