For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

’याद राखा!‘... जातीय सलोखा

06:30 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
’याद राखा ‘    जातीय सलोखा
Advertisement

सत्ता कोणाचीही असली तरी सणासुदीच्या वेळी जातीय सलोख्याला धक्का पोहोचू नये, यासाठी पोलीस दलाकडून उपाययोजना केल्या जातात. सत्ता बदलली की अधिकाऱ्यांचा सूरही बदलतो. त्यामुळेच गोंधळात भर पडते. टी. नरसीपूरचे प्रकरणही असेच आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने दमदाटीची भाषा न वापरता समन्वयाची भूमिका घेतली असती तर कदाचित संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला नसता. ‘याद राखा! माझ्याशी गाठ आहे!’ अशी भाषा वापरल्यामुळे गणेशभक्त आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते हट्टाला पेटले.

Advertisement

बेळगावसह कर्नाटकात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्या-मुंबईनंतर बेळगावात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा होतो. बेळगावला लागून असलेल्या सीमाभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातही उत्सवावर महाराष्ट्राची छाप दिसून येते. म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपूर येथे गणेशोत्सवा आधीच काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष सुरू झाला आहे. ‘गावातील मशिदीसमोरून मिरवणूक काढू नका, जर त्याच मार्गावरून जाण्याचा हट्ट धरलात तर याद राखा!’ अशी तंबी टी. नरसीपूरचे पोलीस निरीक्षक धनंजय यांनी दिली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपने ही धमकी गांभीर्याने घेतली. गणेशचतुर्थीच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह खासदार यदुवीर श्रीकंठ दत्त वडेयर व इतर नेते टी. नरसीपूरला पोहोचले. या गावातील गणेशोत्सवावरून वाद सुरूच आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे, या मागणीसाठी हातात गणेशमूर्ती घेऊन भाजप नेत्यांनी टी. नरसीपूर पोलीस स्थानकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्याची काहीच चूक नाही. एखादी मिरवणूक काढण्याआधी कोणत्या मार्गावरून जायचे, मिरवणुकीत काय असावे, काय नसावे याविषयी पोलीस दलाकडून सल्ला दिला जातो. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी टी. नरसीपूरमधील अधिकाऱ्यांनीही सल्लाच दिला आहे. असे असताना कोणत्या कारणासाठी त्याला निलंबित करायचे? अशी भूमिका घेत पोलीस दल व पर्यायाने राज्य सरकार त्या अधिकाऱ्याच्या मागे राहिले. पोलीस स्थानकाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व दिवसरात्र आंदोलनासाठी धडपडणाऱ्या भाजप नेत्यांची धरपकड करण्यात आली.

Advertisement

अशा प्रकरणांकडे भाजप, काँग्रेस, निजद आदी राजकीय पक्षांच्या चष्म्यातून न पाहता एखाद्या गावातील शांततेला सुरुंग लागू नये, धक्का पोहोचू नये, यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना या दृष्टीने पाहिले तर संघर्ष होणार नाही. सत्ता कोणाचीही असली तरी सणासुदीच्या वेळी जातीय सलोख्याला धक्का पोहोचू नये, यासाठी पोलीस दलाकडून उपाययोजना केल्या जातात. सत्ता बदलली की अधिकाऱ्यांचा सूरही बदलतो. त्यामुळेच गोंधळात भर पडते. टी. नरसीपूरचे प्रकरणही असेच आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने दमदाटीची भाषा न वापरता समन्वयाची भूमिका घेतली असती तर कदाचित संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला नसता. ‘याद राखा! माझ्याशी गाठ आहे!’ अशी भाषा वापरल्यामुळे गणेशभक्त आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते हट्टाला पेटले. मशिदीसमोरून मिरवणूक जायची नाही तर कोठून जायची? असा सवाल उपस्थित करीत पोलीस अधिकाऱ्याला आक्षेप घेतला. आम्ही पाकिस्तानात गणेशोत्सव साजरा करतो आहोत का? असा सवाल माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनीही उपस्थित करत त्या पोलीस अधिकाऱ्याची झाडाझडती घेतली.

एका गावापुरती मर्यादित असलेली ही गोष्ट आता संपूर्ण राज्यात ठळक चर्चेत आली आहे. गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यावर टीका करीत टी. नरसीपूरमधील पोलीस अधिकाऱ्याचे समर्थन केले आहे. जातीय सलोख्याला धक्का पोहोचू नये, यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळ्या मिरवणुकांसंबंधी मार्गदर्शन केले जाते. असे असताना राजकीय कारणासाठी पोलीस स्थानकासमोर निदर्शने करून हिंदुत्वाचा मुखवटा घालणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सांगतानाच सण-उत्सवाच्या आडून जातीय सलोख्याला धक्का पोहोचवण्याचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. सध्या हिंदू संघटना आणि भाजप नेत्यांचे लक्ष टी. नरसीपूरकडे लागले आहे. बुधवारी या गावात विसर्जन मिरवणूकही झाली. फटाके फोडण्याचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. म्हणून या मुद्द्यावरही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी व त्यांचे कुटुंबीय, समर्थकांच्या घरांवरील ईडीच्या कारवाईसंबंधीही भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईडीकडे कोणी तक्रार केली आहे? याची आपल्याला कल्पना आहे. तक्रार करणारे काँग्रेसमध्ये आहेत. त्यांची मते मात्र भाजपमध्ये आहेत, असे सांगत सतीश जारकीहोळी यांनी आपल्याविरुद्ध तक्रार करणारे आपल्याच पक्षाचे आहेत, असा गौप्यस्फोट केला होता. भाजपला त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची गरज नाही. सतीश जारकीहोळी हे 2028 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठीचे दावेदार आहेत. ते मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काँग्रेसमधील नेत्यांनीच हे कृत्य केले असावे, अशा शब्दात भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे. माजी मंत्री के. राजण्णा यांनीही ईडीच्या कारवाईमागे स्वकियांचाच हात असल्याचा आरोप केला आहे. कारण, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुडामधील भूखंड घोटाळ्यासंबंधीची तक्रारही आपल्याच पक्षातील नेत्यांनी केली होती. आता सतीश जारकीहोळी यांच्यावरील कारवाईमागेही आपल्याच पक्षातील नेते आहेत, असा आरोप राजण्णा यांनी केला आहे.

सतीश जारकीहोळी यांच्या घरावरील छाप्यानंतर ईडीचे संचालक राहुल नवीन बेंगळूरला आले होते. सध्या सुरू असलेली केपीएससीमधील परीक्षा घोटाळ्याची चौकशी व सतीश जारकीहोळी यांच्यावरील तपासणी सहा ते आठ महिन्यात पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याची सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे. ही प्रकरणे ताजी असतानाच केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दसऱ्यात धक्कादायक बातमी उघड करणार असल्याचे सांगितले आहे.

परदेशाला जाण्यापूर्वी परदेशातून परतल्यानंतर केवळ राज्यच नव्हे तर देश हादरवणारी बातमी आपण देणार आहे. परदेशातून परतल्यानंतर तारखेत बदल केल्याचे जाहीर केले आहे. दसरोत्सवाच्या सुरुवातीलाच देश हादरवणारी बातमी आपण देणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व एच. डी. कुमारस्वामी यांच्यातील संघर्षाला दसऱ्यानंतर धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.