डोकेदुखी थांबविण्यासाठी उपाय
चीनच्या पूर्वभागातील जियांगसू या प्रांतात वास्तव्य करणाऱ्या ली यू नामक 50 वर्षीय महिलेची ही कथा आहे. या महिलेला मायग्रेन किंवा अर्थशिशीचा विकार आहे. या विकारामुळे ती वैतागली आहे. अर्धशिशी हा विकार कोणत्याही औषधाने पूर्णत: बरा होत नाही. त्याचे केवळ व्यवस्थापन करुन तो हाताबाहेर जाऊ नये. एवढेच पहावे लागते. या महिलेच्या संदर्भात हा विकार सातत्याने उद्भवत असल्याने तिला खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. या विकारावर पारंपरिक उपचारांपेक्षा काही वेगळे उपाय आहेत काय, याचा शोध घेत असताना तिच्या वाचनात एक जगावेगळा उपाय आला. माशाचे पित्ताशय गिळल्यास शरीरातील विषारी पदार्थाचा निचरा होतो, अशी माहिती तिच्या वाचनात आली. त्यानंतर तिने तो उपाय करुन पाहण्याचा निर्धार केला. तिने 14 नोव्हेंबर 2025 या दिवशी मासेबाजारातून एक मोठा संपूर्ण मासा विकत आणला. त्याचे पित्तायश काढले आणि ते गिळंकृत केले. आता आपली डोकेदुखीची समस्या दूर होईल असे तिला वाटले. तथापि, हा उपाय जवळपास तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली. तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिला रुग्णालयात अतिदक्षता विभागात न्यावे लागले. माशाचे पित्ताशय गिळल्याने तिचा अर्धशिशीचा विकार तर दूर झाला नाहीच, पण तिला विषबाधा झाली आणि तिची प्रकृती एकदम अत्यवस्थ झाली. कुटुंबियांनी लगबगीने धावपळ केल्यानेच केवळ तिचा जीव वाचू शकला.
ही घटना सध्या सोशल मिडियावर खूप गाजत आहे. या घटनेवरुन आपल्या सर्वांना एक धडा मात्र अवश्य मिळतो. तो असा, की कोणत्याही अनधिकृत माहितीच्या आधारे स्वत:वर कधीही उपचार करु नयेत. कोणत्याही प्रकारचा विकार असला, तरी डॉक्टरचा सल्ला घेऊनच, त्याप्रमाणे औषध योजना करावी. अन्यथा जीवावर बेतू शकते. विशेषत: सोशल मिडियापासून या संदर्भात अतिसावध रहावे.