राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक अध्यापन योजना
राज्य सरकारकडून विस्ताराचा प्रयत्न : शिक्षणात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ
बेळगाव : अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांसाठी राज्य सरकारकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन योजना अमलात आणण्यात येणार आहे. सरकारी शाळेतील सुमारे 18 लाख मुले या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पूर्ण क्षमतेने विस्तारित करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर जारी केलेल्या या योजनेच्या 2025-26 शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व तयारी सुरू आहे. दसऱ्याच्या सुटीनंतर सदर योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांची ओळख पटवून शाळेच्या कालावधीतच त्यांना अध्यापन करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पुस्तके व शिक्षकांना अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात येणार आहे.
गणित, विज्ञान, समाज विज्ञान, कन्नड व इंग्रजी विषयांतील सराव पुस्तके शिक्षण संशोधन प्रशिक्षण निर्देशालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार आहेत. पीपल फॉर अॅक्शन व जी-पाल यासारख्या स्वयंसेवा संस्था या योजनेत सहभागी होणार असून वेळोवेळी त्यांच्याकडून सल्ला घेण्यात येणार आहे. 40 ते 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या मुलांसाठी उपचारात्मक अध्यापन योजनेंतर्गत किती वर्ग आयोजित करावेत, याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच मुलांच्या संख्येनुसार वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. अनेक शैक्षणिक जिल्ह्यांचा दहावी परीक्षेचा निकाल कमी लागला असून अनुत्तीर्णांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच मुलांनी कोणत्या टप्प्यात किती अध्ययन करावे हे लक्षात घेऊन सदर वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ही योजना अमलात आणण्यात येणार असून अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिकविणार
वर्गासाठी पुरविण्यात येणारी पुस्तके 80 ते 100 पानांची असणार आहेत. मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिकविले जाणार आहे. राज्यात एकूण 35 शैक्षणिक जिल्हे आहेत. त्यापैकी दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, शिर्शी, शिमोगा, हासन, चिक्कमंगळूर, कोडगू जिल्ह्यांमध्ये एकूण शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. या जिल्ह्यांमधील काही शाळांमधील मुलांचा शिक्षणाचा स्तरदेखील कमी असू शकतो. तथापि, या जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक अध्यापन योजना लागू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.