श्री देव खाप्रेश्वराच्या मूर्तीचे स्थलांतर
मंदिरही केले जमिनदोस्त, भाविकांमध्ये चीड : वटवृक्षाचे तीन भाग करुन केले स्थलांतर,सरकारी खर्चाने उभारणार नवे मंदिर
पणजी : पर्वरी येथील ‘वडाकडे’ येथे असलेल्या श्री देव खाप्रेश्वर मंदिरातील मूर्ती सोमवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास कडक पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आली असून ती जेएमजे हॉस्पिटलजवळ असलेल्या कंत्राटदाराच्या कंटेनरमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा आहे. काळोखात मूर्ती काढली म्हणून तेथील ग्रामस्थ तसेच भाविकांनी संताप वर्तवला आहे. मूर्ती हटवताना मंदिराचे उरलेले पत्र्यांचे बांधकामही जमिनदोस्त करण्यात आले. हे सर्व रात्री केले म्हणून भाविक वर्गात चीड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मंदिराजवळ असलेल्या पुरातन वटवृक्षाचे तीन भाग करण्यात आले असून ते सुद्धा तेथून काढण्यात आल्याने तेथील जागा रस्ता रुंदीकरणासाठी मोकळी झाली आहे.
रविवारी रात्री मूर्ती काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला परंतु त्यास भाविकांनी विरोध केल्याने कारवाई थांबवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात येऊन काम स्थगित करण्यात आले होते. त्यावेळी रात्री किंवा पहाटे मूर्ती काढली जाणार याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे सकाळी भक्तमंडळी मंदिराकडे आली तेव्हा मंदिरासह श्रीखाप्रेश्वराची मूर्ती नाहीशी झाल्याचे त्यांना दिसून आले. रात्रीच्यावेळी मूर्ती काढण्याच्या कृतीचा भक्तमंडळीनी निषेध नोंदवला. भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुकूर येथे श्री खाप्रेश्वर मंदिरासाठी जागा देण्याचा विचार चालू असून त्या दृष्टीने वटवृक्षाचे तीन भाग तेथे नेल्याचे सांगण्यात आले. परंतु अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भक्तांची दर्शनासाठी गर्दी
कंत्राटदाराच्या कंटेनरमध्ये ज्या ठिकाणी मूर्ती ठेवली आहे तेथे अनेक भाविक लोक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत असून फुले, हार, फळे अर्पण करीत असल्याचे दिसून येत आहे. रात्री मूर्ती काढली जात असल्याची माहिती मिळताच काही भक्तमंडळी तेथे जमली परंतु मोठ्या पोलिस बंदोबस्तासमोर त्यांना काही करता आले नाही. पोलिसांनी मूर्तीकडे जाण्यास लोकांना मज्जाव केला. भाविकांच्या समोरच मूर्ती काढून मंदिराचे पत्रे हटवण्यात आले तसेच वटवृक्षदेखील तेथून दुसरीकडे नेण्यात आला.
राजकीय नेत्यांकडून निषेध
पर्वरी येथील श्री देव खाप्रेश्वर मंदिरासह मूर्ती हटवण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा विविध राजकीय पक्षनेत्यांनी निषेध केला आहे. भक्तांच्या समोर मंदिरास व मूर्तीस हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती म्हणून ते काम रात्री उशिरा व पहाटे 3 वा. करण्यात आले. एवढ्या रात्री तेथे कोण असणार नाही. तणावाचा विषय होणार नाही तसेच कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही म्हणून हे काळेकृत्य काळोखात केल्याची टीका सरकारवर होत आहे. रविवारी तणावग्रस्त झालेले वातावरण सोमवारी निवळल्याचे दिसून आले. दरम्यान, हटवण्यात आलेल्या मंदिराच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रात्रीच्यावेळी ते काम करण्यात आले असल्याचा दावा सरकारतर्फे केला जात आहे.
भाजपची कृती सालाझारशाही सुनील कवठणकर : काँग्रेस पक्षाकडून पोलीसात तक्रार
मुघल, पोर्तुगीज राजवटीत हिंदूंची देवळे मोडण्यात आली. आता त्याच वाटेवर भाजप जात असून, हे भाजप सरकार म्हणजे मुघल, सालझारशाहीचे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्वरीतील श्री खाप्रेश्वर देवाची मूर्ती हटवून आणि मंदिर हटवून भाजप सरकारने विटंबना केलेली आहे. भाजपची ही कृती सालाझारशाही पद्धतीची आहे, हिंदू भाविक ही गोष्ट कधीच विसरणार नाहीत असे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 200 वर्षे जुने वटवृक्ष कापून शेजारील मंदिर पाडण्याच्या या धक्कादायक आणि लज्जास्पद घटनेने भाजपचे हिंदूंवरील दुटप्पी प्रेम उघड झाले आहे. आरएसएस, बजरंग दल यांसारख्या भाजपशी संबंधित सर्व संघटनांनी बाळगलेले मौन हे केवळ हे भाजपसाठी काम करणारे हिंदू लोक असल्याचे सिद्ध करून दाखविल्याचा आरोपही कवठणकर यांनी केला. पर्वरीतील शॉपिंग मॉल वाचवण्यासाठी सरकारने सोयीस्करपणे मार्ग काढला. परंतु खाप्रेश्वर देवाचे मंदिर वाचविण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्षाच्यावतीने पर्वरी पोलीस ठाणे, संयुक्त मामलेदार तसेच उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविऊद्ध खाप्रेश्वर देवाची विटंबना केल्याबद्दल तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितले. भाजपच्या हिंदूत्ववादी संघटनांना पर्वरीतील खाप्रेश्वर देवाची विटंबना दिसली नाही का? असा प्रश्न करीत कवठणकर यांनी आरएसएस, बजरंग दल, सनातन या भाजपच्या संघटनांवर आरोप केले.
सरकारने केले महापाप : आपचे संयोजक अमित पालेकर यांचा आरोप
श्रीखाप्रेश्वर देवाची मूर्ती हटविण्याचे महापाप भाजप सरकारने केले आहे. कोणत्याही पद्धतीचा धार्मिक विधी न करता ही मूर्ती हटविण्यात आली आहे. खाप्रेश्वर देवाची मूर्ती हलविण्यापूर्वी दुसरीकडे मंदिर उभारण्याची गरज होती. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष करून मंदिर हटवले. सरकारने मंदिर उभारणीचे आश्वासन पूर्ण न केल्यास खाप्रेश्वर मंदिर उभारणीसाठी भिक्षुक बनून आम्ही निधी जमवू आणि या निधिद्वारे मंदिर उभारू, असे आम आदमी पक्षाचे संयोजक अमित पालेकर यांनी सांगितले. पणजीतील आपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अमित पालेकर यांनी खाप्रेश्वर देवाचे मंदिर हटविण्याच्या प्रकाराची तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते चेतन कामत तसेच अन्य उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी मंदिर, मूर्ती हटविण्यास 2019 सालीच दिली होती मंजुरी : खंवटे
श्रीखाप्रेश्वर मंदिर प्रकरणात ‘राजकारण’ होत असल्याचे प्रत्युत्तर स्थानिक आमदार व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले आहे. ते म्हणाले की, 2019 मध्ये आपण सत्ताधारी पक्षात नव्हतो, तर विरोधी पक्षात होतो. तेव्हा श्री देव खाप्रेश्वराच्या पदाधिकारी, भक्तांनी मंदिरासह मूर्ती स्थलांतरित करण्यास स्वाक्षरीसह अनुमती दिली होती. तेच लोक आता विरोध करीत आहेत. त्यावेळी त्यांनी विरोध करायला हवा होता. तो का केला नाही? अशी विचारणा खंवटे यांनी केली आहे. त्यांच्या अनुमतीनंतर उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरण प्रकल्प पुढे नेण्यात आला. आता पुलाचे बांधकाम चालू असताना उभारलेला खांब हलवता येत नाही आणि उड्डाणपूल प्रकल्पात बदल करता येत नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे, असे खंवटे म्हणाले.