पंधरा गावातील ३६६ कुटुंबांना स्थलांतर नोटिसा
चिपळूण :
मागील २० वर्षातील पूर व आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन येथील प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तालुक्यातील १५ गावात दरडी आणि पुराचा धोका असलेल्या ३६६ कुटुंबांना दरवर्षीप्रमाणे स्थलांतराच्या नोटिसा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष बाब म्हणजे पूर परिस्थितीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधीक्षक अभियंत्यांना पूर परिस्थितीत वीजनिर्मिती कशाप्रकारे करावी, या बाबतच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत कामकाज चालणार आहे. त्यामुळे चिपळूणच्या दृष्टीने हा निर्णय तितकाच महत्वाचा मानला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
याच पद्धतीने चिपळूण नगर परिषदेची यंत्रणाही आतापासूनच सज्ज झाली आहे. शहरात पूरबाधित म्हणून १० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांवर नियुक्त केलेली ७ पथके विशेष लक्ष ठेऊन राहणार आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ५ ठिकाणी भोंगे वाजणार असून ८० पोहणाऱ्या तरुणांचीही गरज भासल्यास मदत घेतली जाणार आहे. याशिवाय नगर परिषदेने ६ यांत्रिक फायबर होड्या, ५ बिगर यांत्रिक होड्या, १२० लाईफ जॅकेट, ११० बोये, १७ रस्सी बंडल, १० रबरी ट्युब, १० करवत, ११ कोयत्या, १२ पारई, १० कटावणी, ११ हातोड्या, १५ चार्जिग बॅटऱ्या, ५ मेगाफोन, ७ वॉकी टॉकी, १ सॅटेलाईट फोन आदी साहित्य सज्ज ठेवले आहे. तसेच पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे नुकतेच नगर परिषदेच्या १२० कर्मचाऱ्यांना बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचाही चांगला उपयोग होणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत ग्रामीण भागातही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दरडग्रस्त गावांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात पेढे, परशुराम घाट, तिवरे (गावठाणवाडी, फणसवाडी), तिवडी (उगवत्तवाडी), पेढांचे (रींगी धनगरवाडी), येगाव, कामथे खुर्द, कापसाळ, गोवळकोट, मिरजोळी, कळकवणे, आकले, कोळकेवाडी, पोफळी, कळंबट व वीर आदी ठिकाणी दरडीचा धोका आहे. एखाद्या गावात आपत्कालीन घटना घडल्यास तेथील शाळांमध्ये निवारा केंद्र स्थापन केले जाणार आहे.
- शहरात ६ ठिकाणी निवारा केंद्रे
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पूर क्षेत्राबाहेर ६ ठिकाणी निवारा केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. यामध्ये पाग मराठी शाळा, डीबीजे महाविद्यालय, पाग महिला विद्यालय, ओझरवाडी मराठी शाळा, नगरसे परिषद इमारत उक्ताड, पाटीदार भवन कापसाळ, रावतळे यांचा समावेश असून यात सुमारे १ हजार ६०० नागरिक राहतील, अशी व्यवस्था आहे.
- १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम
आपत्तीबाबत नागरिकांना वेळीच पूर्वसूचना मिळाव्यात, यासाठी शहरातील उक्ताड गणपती मंदिर गोरीवले इमारत, अलिना अपार्टमेंट भेंडीनाका, मनोहर आर्केड बुरुमतळी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, देसाई बिल्डींग काविळतळी, कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका, बाजारपेठ गांधीचौक, कमलकुंज बिल्डींग पेठमाप, गोवळकोटरोड सॉमिलशेजारी, गोवळकोटरोड कमानीजवळ अशा १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे.
- नियंत्रण कक्षात रात्रपाळीही सुरू
नगर परिषद कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथे नियुक्त कर्मचारी लहान-मोठ्या सर्व घटनांच्या नोंदी ठेवणार आहे. तसेच यापुढे ३० सप्टेंबरपर्यंत येथे रात्रीचाही हा कक्ष कार्यरत राहणार आहे. या मुदतीत दीर्घ रजा व मुख्यालय सोडण्यात येऊ नये, असे आदेश मुख्याधिकारी भोसले यांनी सर्व कर्मचाऱ्यांना नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.