संतिबस्तवाडमध्ये धार्मिक चिन्हांची तोडफोड
अज्ञातांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलिसात तक्रार
बेळगाव : संतिबस्तवाड, ता. बेळगाव येथील ईदगाह मैदानावर असलेल्या इमारतीचे मिनार व घुमट यांची तोडफोड करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून यासंबंधी अज्ञातांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. 12 एप्रिलच्या सायंकाळी 6 पासून रविवारी सकाळी 7 या वेळेत अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. यासंबंधी संतिबस्तवाड येथील मोहम्मद गौससाब तहसीलदार यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक आदित्य राजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याच परिसरात असलेल्या काही थडग्यांवरील नावांच्या पाट्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे. धार्मिक भावनांना धक्का पोचवण्यासाठी अज्ञातांनी हे कृत्य केले असून तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.