धर्मांधता मुळावर उठत आहे!
नाशिक आणि अमरावती येथे उघडकीस आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांनी या आठवड्यात उच्चपदस्थांची आणि उच्च शिक्षितांमधील धर्मांध वृत्ती आणि आंधळेपणा उघडा पडला. आपला हेतू साध्य करण्यासाठी ही मंडळी महाराष्ट्राच्याच गळ्याला नख लावण्यापूर्वी यांचा बिमोड केला गेला पाहिजे.
नाशिकमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमधील प्रमुख उच्चशिक्षित मुस्लिम इंजिनियर धर्मांतरासाठी खेळ करत असल्याचे आणि त्यांना त्यांच्या कंपनीतून काही महिलाही साथ देत असल्याचे उघडकीस आले. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी एक लव जिहादचे प्रकरण उकरून काढून मुस्लिम युवक हिंदू युवतींचा लैंगिक छळ करत असल्याचे आरोप करून वादळ उठवले खरे. पण या प्रकरणात मुस्लिम तरुणींचेच लैंगिक शोषण झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न फसला असला तरी उच्चशिक्षित आणि उच्च पदस्थांची धर्मांध वृत्ती महाराष्ट्राच्या मुळावर उठेल की काय अशी शंका यामुळे निर्माण झाली आहे.
नाशिकमधील टाटा प्रकल्पात महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारींवरून 9 फिर्यादी दाखल झाल्या. या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, निदा खान ही एक महिला आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलांच्या जबाबांनुसार, कार्यालयीन वरिष्ठांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकला. काही प्रकरणांत जबरदस्तीने वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले, तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत:चे लग्न लपवून एका महिला कर्मचाऱ्याशी संबंध ठेवले होते. या घटनेचा पर्दाफाश संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने कार्यालयात येऊन केल्याची माहिती समजते आहे. तसेच काही पीडितांनी धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप झाल्याचे आरोप केले आहेत. नमाज पढण्यास भाग पाडणे किंवा विशिष्ट धार्मिक विचार स्वीकारण्याचा दबाव टाकणे, असे आरोप नोंदवण्यात आले आहेत. पीडित महिलांचे वय प्रामुख्याने 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असून, हा छळ दोन ते चार वर्षांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कंपनी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, विशेष तपास पथकाकडून तपास सुरू आहे. या गंभीर आरोपांमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त झाला; मात्र काही गटांकडून या प्रकरणाला “कॉर्पोरेट जिहाद” असे स्वरूप देण्याचा प्रयत्नही झाला.
दरम्यान, अमरावती (परतवाडा) येथील प्रकरण सुरुवातीला “लव्ह जिहाद” म्हणून चर्चेत आले; परंतु पोलीस फिर्याद आणि पुढील तपासातून वेगळे चित्र समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय 19) असून, त्याच्यासह उझैर इक्बाल खान आणि इतर पाच जणांवर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि त्याच आधारे ब्लॅकमेल करणे, असे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी पोक्सो आणि आयटी अंतर्गत कारवाई सुरू आहे. तपासात असेही स्पष्ट झाले की, आरोपींमध्येच झालेल्या वादातून काही व्हिडिओ बाहेर आले आणि त्यानंतर प्रकरण उघड झाले. विशेष म्हणजे, चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित मुली मुस्लिम समाजातीलच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुरुवातीला करण्यात आलेला “हिंदू मुलींना लक्ष्य” केल्याचा दावा तपासात सिद्ध झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी या घटनेला “लव्ह जिहाद”चे उदाहरण ठरवत राज्यभरात अशा प्रकारचे संघटित कट चालू असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यांमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला. मात्र महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी चौकशी केल्यानंतर स्पष्ट केले की, उपलब्ध पुराव्यांनुसार हा धार्मिक कट नसून गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे. काही घटकांकडून जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोन्ही प्रकरणांचा एकत्रित विचार केला असता एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो. नाशिकमध्ये महिला कर्मचाऱ्यांवरील छळ आणि संभाव्य धार्मिक दबावाचा गंभीर प्रश्न आहे, तर अमरावतीत अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाचे स्पष्ट प्रकरण आहे. तरीही या दोन्ही घटनांमध्ये सुरुवातीला चर्चेचा केंद्रबिंदू गुन्हे नसून “धर्म” बनवण्यात आला. गुह्याला धार्मिक रंग दिला गेला की मूळ मुद्दा मागे पडतो आणि समाजात भीती व अविश्वास वाढतो. नाशिकमध्ये “धर्मांतर” आणि अमरावतीत “लव्ह जिहाद” या संज्ञांनी वातावरण ढवळून निघाले; मात्र तपासातून या दाव्यांची मर्यादा उघड झाली आहे. अशा प्रकारे अपूर्ण माहितीवर आधारित निष्कर्ष काढल्याने न्यायप्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांमधून एक स्पष्ट धडा मिळतो. गुन्हा हा गुन्हाच असतो; त्याला धर्माचे लेबल लावणे योग्य नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, पण ती कायद्याच्या चौकटीत आणि पुराव्यांच्या आधारेच झाली पाहिजे. अन्यथा, समाजात अनावश्यक ध्रुवीकरण वाढते आणि वास्तविक पीडितांचा आवाज दुर्लक्षित होतो.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात विवेक, संयम आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अन्यथा, गुह्यांपेक्षा त्यावरून निर्माण होणारे धार्मिक वाद अधिक धोकादायक ठरतील.
शिवराज काटकर