दार्जिलिंगमध्ये मदतकार्याला वेग
हजारो पर्यटक अडकले : मृतांचा आकडा 24 वर, अजूनही काहीजण बेपत्ता
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या 24 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये सात मुले समाविष्ट आहेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता असून मदत व बचावकार्याला गती देण्यात आली आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली. दार्जिलिंग आणि सिक्कीममधील रस्ते संपर्क देशाच्या उर्वरित भागापासून तुटल्यामुळे हजारो पर्यटक अडकले आहेत.
गेल्या दोन दिवसात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मुसळधार पावसात दार्जिलिंग आणि कुर्सियांग दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग तुटला आहे. मिरिक आणि दुधियाजवळील लोखंडी पूल कोसळल्याने दार्जिलिंग ते सिलिगुडी हा पर्यायी मार्गही बंद झाला आहे. बऱ्याच भागांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद झाल्याने आता मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. अलीपुरद्वारमध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे बऱ्याच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. दार्जिलिंग आणि कालिम्पोंगमधील चहाचे मळे पाण्याखाली गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दार्जिलिंग आणि बंगालमधील इतर जिह्यांमध्ये 24 तासांत अंदाजे 16 इंच पाऊस पडला. स्थानिकांच्या मते, 1998 नंतर पहिल्यांदाच असा पाऊस पडला आहे. दार्जिलिंग, कालिम्पोंग, जलपाईगुडी आणि कूचबिहारमध्ये मंगळवार सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याने व्यापल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.