कुंभमेळ्यातील मृतांच्या कुटुंबीयांना साहाय्यधन
कुटुंबीयांच्या बँक खात्यावर 25 लाख रुपये जमा
बेळगाव : महाकुंभ मेळ्यातील प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये बेळगावच्या ज्या चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे 25 लाख रुपयांचे साहाय्यधन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमध्ये 29 जानेवारी रोजी बेळगावचे ज्योती हत्तरवाट, मेधा हत्तरवाट, महादेवी बावनूर व अरुण कोपर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर बेळगाव प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तेथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मृतदेह बेळगावला आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या चौघांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याची मागणी होत होती. याची दखल घेऊन मोहम्मद रोशन यांनी प्रयागराजचे डीएम म्हणजे डिस्ट्रीक्ट मॅजेस्ट्रेट रवी मंदेर यांच्याशी चर्चाही केली. प्रत्येक मृतांच्या कुटुंबाच्या बँक खात्यावर 25 लाख रुपये जमा केल्याचे रोशन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उत्तरीय तपासणी अहवालामध्ये व मृतांच्या मृत्यू दाखल्यात शुद्धलेखनाच्या चुका असून त्या दुरुस्तीची विनंतीही आपण केली. त्यांनी दोन दिवसांत या चुका दुरुस्त करून अहवाल पाठवू, असे आश्वासन दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.