डी. के. शिवकुमार यांना दिलासा
मतदारांना आमिष, धमकीप्रकरणी एफआयआरला स्थगिती
बेंगळूर : बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातील एका अपार्टमेंटमधील रहिवाशांना आमिष आणि धमकी दिल्याच्या आरोपावरुन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात आरएमसी यार्ड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. या एफआयआरला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिवकुमार यांना ऐन दिलासा मिळाला आहे. आपल्या विरोधात दाखल झालेला एफआयआर रद्द करावा अशी याचिका शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. गुरुवारी या याचिकेवर न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणीपर्यंत डी. के. शिवकुमार यांच्यावर बळजबरीने कोणतीही कारवाई करू नये, अशी सूचना दिली. तसेच निवडणूक प्रचाराचा दर्जा खालावत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणूक प्रचाराच्या भाषणावेळी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही खंडपीठाने नेत्यांना दिला.
निवडणूक प्रचारावेळी राजराजेश्वरीनगर येथील अपार्टमेंटमधील रहिवाशांची सभा घेताना डी. के. शिवकुमार यांनी मी बिझनेस डिलसाठी येथे आलो आहे. अपार्टमेंटना सीए भूखंड द्यावे आणि कावेरी नदीचे पाणी पुरवावे, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी शिवकुमार यांनी बेंगळूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार डी. के. सुरेश यांना मतदान केल्यास तुमच्या मागण्या दोन महिन्यात पूर्ण करेन. अन्यथा माझ्याजवळ काही विचारु नका, असे सांगितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान निवडणूक अधिकारी दिनेशकुमार यांनी आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी 19 एप्रिल रोजी मॅजिस्ट्रेटसमोर तक्रार दाखल केली होती. मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार आरएमसी पोलिसांनी शिवकुमारांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या विरोधात शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीए भूखंड मंजुरी संबंधित अपार्टमेंट रहिवाशांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तर दिले आहे. काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्यास खासदार फंडातून अनुदान देऊन तुमची कामे केली जाऊ शकतात, असे आपण सांगितले होते. यात आचारसहिंतेचे उल्लंघन झालेले नाही. येथील अपार्टमेंट रहिवाशांना आपण धमकी दिलेली नाही. केवळ आपल्याला टार्गेट करुन तक्रार दाखल केलेली आहे, असा युक्तिवाद शिवकुमार यांनी केला आहे.