किरकोळ महागाई दराचा दिलासा
जूनमध्ये 2.10 टक्के : मागील 77 महिन्यांमधील नीचांकी पातळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किरकोळ महागाईचा नवा दर सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, जून महिन्यात किरकोळ महागाई 2.10 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. किरकोळ महागाई दराची ही मागील 77 महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये 2.05 टक्के ह्या निचतम टक्केवारीची नोंद झाली होती. तसेच मे 2025 मध्ये ती 2.82 टक्के आणि एप्रिल 2025 मध्ये 3.16 टक्के इतकी होती. सरकारी अहवालानुसार, अन्नधान्याच्या किमतीत घट आणि अनुकूल बेस इफेक्ट्समुळे हा परिणाम दिसून आला आहे.
अन्नधान्याच्या किमती सतत कमी होत राहिल्याने किरकोळ महागाई कमी झाली आहे. किरकोळ महागाईचे आकडे सोमवारी म्हणजेच 14 जुलै रोजी जाहीर करण्यात आले आहेत. फेब्रुवारीपासून किरकोळ महागाई आरबीआयच्या 4 टक्के या लक्ष्यापेक्षा कमी आहे. किरकोळ महागाई निर्देशांकामध्ये अन्नधान्य वस्तूंचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. महिना-दर-महिना महागाई 0.99 टक्क्यांवरून उणे 1.06 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जून महिन्यात ग्रामीण भागातील महागाई 2.59 टक्क्यांवरून 1.72 टक्क्यांवर आली आहे. त्याचवेळी, शहरी महागाई 3.12 टक्क्यांवरून 2.56 टक्क्यांवर आली आहे.
सर्वसामान्यांना दुहेरी आनंद
भारतातील सर्वसामान्य लोकांना महागाईबाबत दुहेरी आनंद झाला आहे. सुरुवातीला घाऊक महागाईत मोठी घट झाली होती. त्यानंतर आता किरकोळ महागाई 72 बेसिस पॉइंट्सने घसरून 2 टक्क्यांजवळ आली आहे. ही घसरण प्रामुख्याने अनुकूल बेस इफेक्ट आणि भाज्या, डाळी, मांस, मासे, धान्य, साखर, दूध आणि मसाले यासारख्या प्रमुख वस्तूंच्या दर नियंत्रणामुळे कमी झाली.
तीन महिन्यांपासून हळूहळू घसरण
गेल्या तीन-चार महिन्यात किरकोळ महागाई दरात घट होताना दिसत आहे. तसेच जानेवारी 2019 नंतरची ही सर्वात कमी चलनवाढ आहे. जून हा सलग दुसरा महिना होता जेव्हा महागाई 3 टक्क्यांपेक्षा कमी राहिली. किरकोळ महागाई मे महिन्यात 2.82 टक्के आणि जून 2024 मध्ये 5.08 टक्के इतकी होती. 50 अर्थशास्त्रज्ञांच्या रॉयटर्स सर्वेक्षणात जूनमध्ये किरकोळ महागाई 2.50 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज होता. मात्र, त्यापेक्षाही हा दर कमी झाला आहे.