दिवाळीपूर्वी महागाई दराचा दिलासा
किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये 1.54 टक्के : आठ वर्षांतील सर्वात निचांकी पातळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महागाईच्या आघाडीवर दिवाळी सणापूर्वी सर्वसामान्यांसाठी एक सुखद दिलास मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 1.54 टक्क्यांवर आला असून तो जून 2017 नंतर प्रथमच आठ वर्षांतील सर्वात निचतम पातळीवर पोहोचला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महागाईतील ही घट प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे आणि अलिकडेच जीएसटी दरात कपात झाल्यामुळे झाली आहे.
सांख्यिकी आणि अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ऑगस्टच्या तुलनेत 0.53 टक्क्यांनी कमी झाली. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई 2.07 टक्के होती. सरकारने सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी अधिकृत किरकोळ महागाईचा डेटा जाहीर केला. प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादनांच्या दरात झालेल्या कपातीमुळे महागाई दरात ही लक्षणीय घट दिसून येत असल्याचे मुख्य कारण देण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये अन्नधान्य महागाई -2.28 टक्के होती. तर त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ती 0.64 टक्के होती. तसेच ग्रामीण भागात अन्नधान्य महागाई -2.17 टक्के आणि शहरी भागात -2.47 टक्के होती. या आकडेवारीतून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकांना दिलासा मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील महागाई देखील ऑगस्टमध्ये 1.94 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 1.82 टक्क्यांपर्यंत कमी झाली. त्याचप्रमाणे इंधन आणि ऊर्जेतील किरकोळ महागाई 2.32 टक्क्यांवरून 1.98 टक्क्यांपर्यंत कमी झाली. तथापि, काही क्षेत्रांमध्ये महागाई वाढली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई दर सप्टेंबरमध्ये 3.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर ऑगस्टमध्ये 3.09 टक्के इतका होता.
जीएसटी सुधारणांचाही परिणाम
महागाई दर कमी होण्यामागे अलीकडील जीएसटी सुधारणा हेसुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. जीएसटी दरांमध्ये कपात केल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते वाहनांपर्यंत सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम किरकोळ महागाईवर झाला आहे.
आरबीआयने महागाईचा अंदाज घटवला
महागाईत सातत्याने घट होत असल्याने, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा महागाईचा अंदाज देखील कमी केला आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलिकडेच किरकोळ महागाईचा अंदाज 3.1 टक्क्यांवरून 2.6 टक्के करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज 1.8 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 1.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 4 टक्के असा कमी केला आहे. तथापि, पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2026-27 मध्ये महागाई 4.5 टक्के पर्यंत वाढू शकते, असेही म्हटले आहे.