For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वोडाफोन आयडियाला दिलासा, सरकारची हिस्सेदारी वाढणार

06:17 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
वोडाफोन आयडियाला दिलासा  सरकारची हिस्सेदारी वाढणार
Advertisement

कंपनीची शेअरबाजाराला माहिती : 36,950 कोटीचे समभाग सरकारकडे द्यावे लागणार

Advertisement

मुंबई :

आर्थिक संकटात सापडलेल्या दूरसंचार क्षेत्रातील वोडाफोन आयडियाला सरकारने मोठा दिलासा दिला आहे. वोडाफोन आयडियाकडून भरण्यात येणारी थकबाकी सरकारने समभागांमध्ये रुपांतरीत करण्याचे निश्चित केले आहे. यानंतर सरकारची वोडाफोन आयडियामधील हिस्सेदारी 49 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

Advertisement

हिस्सेदारी 49 टक्क्यांवर पोहचणार

36 हजार 950 कोटी रुपये रक्कम वोडाफोन आयडियाकडून सरकारला अपेक्षित होती. जिचे रूपांतर सरकार आता समभागांमध्ये करणार आहे. यानंतर वोडाफोन आयडियामध्ये सरकारची हिस्सेदारी सध्याच्या 22.6 टक्क्यांवरून जवळपास 49 टक्क्यांवर पोहोचणार आहे. वोडाफोन आयडियाने ही माहिती शेअर बाजाराला सोमवारी दिली.

कशी असणार प्रक्रिया

दूरसंचार मंत्रालयाने सप्टेंबर 2021 मध्ये दूरसंचार क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासोबतच पॅकेजचे सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत आता येणाऱ्या 30 दिवसाच्या आत वोडाफोन आयडियाला 36,950 कोटीचे समभाग सादर करावे लागणार आहेत. दहा रुपये फेस व्हॅल्यू असणारे 3695 कोटीचे इक्विटी समभाग 10 रुपयाच्या किमतीवर जारी करण्याचे आदेश मिळाले आहेत. सेबी आणि इतर नियामक प्राधिकरणाची मंजुरी याकरता मिळण्याची आवश्यकता आहे.

पूर्वीपासूनची स्थिती

2021 मध्ये मंत्रिमंडळाने सुधारणात्मक धोरणाअंतर्गत पॅकेजअंतर्गत सरकार आर्थिकदृष्ट्या संकटात असणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना उर्वरीत कर्जापैकी एक भाग समभागांमध्ये रुपांतरीत करण्याला परवानगी दिली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये 16 महिन्यांच्या चर्चेनंतर सरकारने वोडाफोन आयडियामधील 16 हजार कोटी रुपयांचे व्याज समभागांमध्ये रूपांतरीत करण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर सरकारने या कंपनीत 33 टक्के हिस्सेदारी प्राप्त केली होती. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या कालावधीत सरकारला कंपनीला मूळ रक्कम व व्याज मिळून 12 हजार कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यानंतर आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत दरवर्षी जवळपास 43 हजार कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

समभाग चमकला

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी वोडाफोन आयडियाचे समभाग मंगळवारी शेअर बाजारात 10 टक्के वाढलेले दिसून आले. सरकारकडून दिलासा मिळाल्यानंतर कंपनीचे समभाग मंगळवारी वेगाने वधारलेले दिसून आले. एक वाजून 25 मिनिटांनी शेअर बाजारात वोडाफोन आयडियाचे समभाग 22 टक्के तेजीसह किंवा 1.56 रुपयांसह 8.37 रुपयांवर समभाग पोहोचले होते.

Advertisement
Tags :

.