एसबीआयकडून कर्जधारकांना दिलासा
ईएमआय होणार कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने त्यांच्या गृहकर्जधारकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात केल्याने एसबीआयने देखील त्यांच्या गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे एसबीआयच्या कर्जधारकांना तुलनेत कमी ईएमआय भरावा लागणार आहे.
एसबीआयने कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीमुळे एसबीआयकडून सर्व प्रकारची कर्जे घेणे तुलनेत स्वस्त ठरणार आहे. आता एसबीआयच्या गृहकर्जावरील व्याजदर देखील पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दुसऱ्या धोरण आढावा बैठकीत रेपोदर 25 बेसिस पॉइंटने कमी करत 6 टक्के केला होता. यामुळे मागील दोन महिन्यात एकूण 50 बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे. या कपातीमुळे बँकांना कर्जावरील व्याजदर कमी करता येणार आहेत. मात्र बँकांनी मुदतठेवींवरील व्याजदर कमी केल्यास ठेवीदारांवरही याचा परिणाम होणार आहे.
एसबीआयने त्याच्या रेपो लिंक्ड लँडिंग रेटमध्ये सुधारणा केल्या आहेत. हा दर आता 8.50 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे. याआधी एचडीएफसी बँक आणि महाराष्ट्र बँकेनेही व्याजदर कमी केले आहेत.