टेंभू सिंचन योजनेतून ऐन उन्हाळ्यात दिलासा
कडेगाव :
टेंभू उपसा सिंचन योजना ही कृष्णा नदीवरील महत्त्वाची सिंचन योजना आहे. तिच्या माध्यमातून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल ८०४७२ हेक्टर क्षेत्र सिंचित होत आहे. सद्यस्थितीत ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी पाणीपट्टी थकबाकी आणि वाढत्या वीजबिलांमुळे अडचणी येत आहेत.
- खरीप आणि रब्बी हंगामात पाणीपुरवठा सुरू
सध्या रब्बी हंगामातील आवर्तन सुरू असून १७ मार्चपर्यंत ४.८६५ टीएमसी पाणी उचलण्यात आले आहे. जून २०२५ पर्यंत अजून ७ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामात १.२१४ टीएमसी पाणी खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यांना पिण्यासाठी देण्यात आले होते.
- वीजबिलाच्या ८१/१९ फॉर्म्युल्यामुळे दिलासा
सिंचन योजनेच्या वीजबिलाचा खर्च प्रचंड वाढला आहे. जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २९.१९ कोटी वीजबिल भरावे लागले आहे. जून २०२५ पर्यंत हा खर्च ६० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. शासन वीजबिलाची ८१ टक्के रक्कम देत असली तरी उर्वरित १९ टक्के रक्कम पाणीपट्टीतून वसूल करावी लागणार आहे.
- शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी थकबाकी, ७/१२ वर येणार बोजा
सध्या विभागाने फेब्रुवारीअखेर ७.७३ कोटी रुपये वसूल केले असले, तरी मार्च अखेर २३.४५ कोटी रुपयांचे वसुलीचे लक्ष्य ठेवलं आहे. शेतकऱ्यांनी ऊस बाहेरील कारखान्यांना गाळपासाठी दिल्याने पाणीपट्टी वसुली रखडली आहे. थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्याची कारवाई सुरू झाली असून पाणीपट्टी न भरल्यास ७/१२ वर थकबाकीचा बोजा नोंदवला जाणार आहे.
- प्रकल्पाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पावले उचलावी लागणार
टेंभू प्रकल्प हा अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून त्याचा लाभ घेण्यासाठी पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. शासनानेही वाढत्या वीजबिलाच्या खर्चावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी व प्रकल्प लाभधारकांकडून होत आहे. पाणीपट्टी वसुलीची समस्या सुटली नाही तर भविष्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.