For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवशेष दर्शन ‘गोंयच्या सायबा’चे

06:29 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
अवशेष दर्शन ‘गोंयच्या सायबा’चे
Advertisement

अवशेष दर्शन सोहळा यशस्वी झाला, यात संदेह नाही. भाविक खूश झालेच आणि सरकारही खूश झाले. एरव्ही विरोधासाठीच विरोध करणाऱ्या राजकारण्यांनी शवदर्शन सोहळा डागाळेल, असे कोणतेही वक्तव्य सरकारविरुद्ध केले नाही, हे बरे झाले. उलट काहींनी सरकारची स्तुतीच केली. ही ‘गोंयच्या सायबां’चीच कृपा म्हणावी. जगातली सर्वांत मोठी अंधश्रध्दा ठरावी अशातलीच ही एक भावभक्ती. तरीही संशय आणि अविश्वास कितीही घोंगावला तरी श्रध्दा, अंधश्रध्देत काडीचाही फरक पडत नाही. देव-धर्माचे फारसे काही बिघडतच नाही. अन्यथा 80 लाख भाविकांनी अवशेष दर्शन का घेतले असते?

Advertisement

गोव्याच्या अवशेष दर्शन सोहळ्याला चार दशकांचा इतिहास आहे. गोव्याने आतापर्यंत भक्तीभावाने जपलेली ही परंपरा आहे. ‘गोंयचो सायब’ अशी श्रध्दा असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियरचा यंदाचा 18वा शवदर्शन सोहळा, अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात यशस्वी ठरला. लाखो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांना सामावून आणि सांभाळून घेणारी चोख सुव्यवस्था उजवी ठरली. दीड महिन्याचे आयोजन आणि नियोजन नीटनेटके होते, असे जबाबदार व्यक्तांनीही कबुल केलेले आहे. व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेबाबत कुणाचीच तक्रार दिसून आली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मेहनतीबाबत कौतुक झाले. एरव्ही भाजपच्या सरकारविरुद्ध उठसूठ आकाश-पाताळ एक होत असताना विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनाही शवदर्शन सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुकच करावेसे वाटले, यातच सरकारचे यश आले. शवदर्शन सोहळ्याच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचाही सन्मान वाढला. ‘यात्रेकरूंचे गाव’ साकारण्याची संकल्पना यंदाच्या सोहळ्यातील आकर्षण ठरले. भाविकांच्या सोयीसाठी जवळजवळ फुकटच, ही कुटीरे उपलब्ध झाली. अगदी नैसर्गिक वातावरणाचा छान आनंद भाविकांना या कृत्रिम गावात घेता आला. जवळपास पंधरा हजार भाविकांनी या सोयीचा लाभ घेतला. ही संकल्पना राबवून ती यशस्वी करणाऱ्यांचे अभिनंदन करायला हरकत नाही.

गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र आहे. जुने गोवे हे धार्मिक स्थळ तर गोव्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदूच. वार्षिक फेस्ताची पर्वणी असतेच. दर दहा वर्षांनी येणारा सेंट फ्रान्सिस झेवियरचा अवशेष दर्शन सोहळा तर गोव्याप्रति असलेल्या आकर्षणात अधिकच भर घालणारा. एरवी पर्यटनाच्या नावाने उडणारा गोंधळ गोव्यात कमी नाही. त्यापासून इथली धार्मिक स्थळे अंतर राखून आहेत, हे गोमंतकीयांसाठी फार मोठे समाधान. जुने गोवेतील या धर्मस्थळाची टापटीप, स्वच्छता एरवीही पर्यटकांना भुरळ घालत असतेच. श्रध्देचा कळस गाठणारा उत्सव म्हणजे शवदर्शन सोहळा. काहींसाठी श्रध्दा तर काहींसाठी अंधश्रध्दा आणि काहींसाठी निव्वळ धंदा. काहींसाठी भावनेचा विषय तर काहींसाठी टवाळीचा. पंढरीच्या वारीला जावे तशा पध्दतीने काही भाविक शेजारच्या राज्यातून पायी चालतही येत असतात, असे ऐकू येते. याच उत्सवाच्या निमित्ताने का होईना, गोव्याच्या पर्यटनाला थोडा जास्तच बहर येतो. कॅसिनो, सनबर्न, नशा-पान, समुद्रकिनाऱ्यांवरील गोंधळ आणि धांगडधिंगाण्यापेक्षा हे पर्यटन गोव्याला परवडणारे. त्यामुळे गोव्यात धार्मिक पर्यटन वाढावे, अशी इच्छा बाळगण्यास हरकत नाही. शवदर्शन सोहळ्यातून त्यादृष्टीने योग्य धडा घेता येईल. दहा वर्षांतून नव्हे तर गोव्याच्या भल्याचेच काही निष्पन्न होत असेल तर हा सोहळा पाच वर्षांतून एकदा आयोजित केला तरी कुणाची हरकत नसावी. पर्यटक भाविक बनून येत असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे. गोव्यात प्रतिपंढरपूर, प्रतिशिर्डी, प्रतितिरुपती बालाजी अशी धर्मस्थळे तयार झाली तर श्रध्दावानांना समाधान मिळेल आणि धंदेवानांचेही समाधान होईल. पर्यटन विस्तारातही भर पडेल.

Advertisement

सेंट फ्रान्सिस झेवियरच्या मृत शरीराचे अवशेष मागची चार दशके गोव्याच्या भूमीत जपले गेले आहेत. जगाच्या नजरा गोव्याकडे नेहमीच वळलेल्या असतात. अवशेष दर्शन सोहळा हा त्यासाठी एक महत्त्वाचा दुवा. काहींना गोव्याची ही परंपरा लादलेली संस्कृती वाटते. तरीही ख्रिश्चन समाजच नव्हे हिंदू धर्मीयसुध्दा या परंपरेत श्रध्देने सामील होतात, यातही संदेह नाही. हल्लीचे सलग तीन अवशेष दर्शन सोहळे भाजप राजवटीतच पार पडले. तेसुध्दा गुण्या-गोविंदाने. 2004 साली भाजपचे पर्रीकर सरकार सत्तेवर होते. पर्रीकरांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि अवशेष दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पणजी ते जुने गोवेपर्यंत जी काही सुधारणा घडवून आणली, ती कायम लक्षात राहील. 2014 साली पर्रीकरांनीच अवशेष दर्शन सोहळा यशस्वी केला. आता 2024 मध्ये डॉ. प्रमोद सावंत सरकारनेही कोणतीच उणीव ठेवली नाही. तरीही भाजपवरील हिंदुत्वाचा ठपका काही जाणार नाही आणि तो समाजही भाजपला आपला मानणार नाही, हेही खरेच आहे. परंपरा खरी असो किंवा खोटी सरकारला परंपरेशी, लोकांच्या श्रध्देशी, त्यांच्या भावनांशी बांधील राहावेच लागते, याचे भान सरकारला आहे.

देव, धर्म आणि श्रध्देचा बाजार थोड्या-फार प्रमाणात सर्वत्रच असतो. त्यामुळेच कधीतरी, कुणीतरी आवाज उठवतोच. सुभाष वेलिंगकर यांनी वर्मावर बोट ठेवून भावनेला हात घातला म्हणून आरडाओरड करण्याची किंवा रस्त्यावर गोंधळ घालण्याची गरजच नव्हती. एकतर श्रध्देला दिलेले आव्हान स्वीकारायची धमक दाखवायची असते आणि शक्य नसल्यास गप्प राहणेच शहाणपणाचे असते. शेवटी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असते. काय मानायचे आणि काय नाही, याचे ज्याला-त्याला स्वातंत्र्य आहेच. धन्य ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी गोमंतकावर स्वारी केली. अन्यथा ‘गोंयचो सायब’ या श्रध्देचा जन्मही झाला नसता. कधीकधी योगायोग, चमत्कार ठरतात आणि संतपदेच नव्हे तर दैवत्वसुद्धा बहाल होते. अनेक हिंदू संतांच्या नावांवर असेच अनेक चमत्कार घुसडले गेले आहेतच.

अखेर पंचेचाळीस दिवसांच्या दर्शन सोहळ्यानंतर ‘गोंयच्या सायबा’चे अवशेष पुन्हा दहा वर्षांसाठी से-कॅथेड्रलहून बॅसिलिका ऑफ बॉम जिझसमध्ये रविवारी विसावले.  आता ओढ 2034 मधल्या दर्शनाची असेल. आजचा बिघडलेला गोवा दहा वर्षांनंतर  कसा असेल, याची कल्पना श्रध्दाळू भाविकांनी करावी. ते स्पेनहून गोव्यात आले आणि गोंयचे सायब बनून गेले. आता आलेली आणि येणारी बडी बडी माणसे गोंयचे बाप बनत आहेत. गोव्याला गिळण्यासाठी सर्वच तुटून पडत आहेत. त्यांच्यापासून गोव्याचे रक्षण व्हायला हवे. वाममार्गाला लागलेला गोवा सावरायची गरज आहे. प्रश्न अस्तित्वाचा आहे. गोव्याच्या रक्षणासाठी आता पुन्हा सायबांनाच साकडे घालत बसायचे की, गोव्याच्या अस्तित्वाची लढाई स्वत:च लढायची, हे आता गोमंतकीयांनीच ठरवायचे आहे.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.