मेटासोबत रिलायन्सची नवी एआय कंपनी
855 कोटींची एकत्रित गुंतवणूक : एआय सेवा विस्तारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा (फेसबुक) यांनी एकत्रित येत नवी एआय कंपनी बनवली असल्याची माहिती नुकतीच देण्यात आली आहे. सदरच्या नव्या कंपनीचे नाव रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड असे ठेवण्यात आले असून यामध्ये एकत्रितरित्या 855 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून हा व्यवहार केला असून रिलायन्स इंडस्ट्रीजने या संदर्भातली माहिती 25 ऑक्टोबर रोजी शेअर बाजाराला दिली आहे. संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवसायामध्ये उद्योजक मुकेश अंबानी आणि मार्क झुकरबर्ग यांच्या कंपन्यांकडून एकत्रितरित्या सुरुवातीला 855 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
कुणाची किती हिस्सेदारी
एआय सेवा विकसित करण्यासोबतच विपणन व विक्रीवर भर देण्याचा प्रयत्न नव्या कंपनीकडून होणार आहे. या नव्या कंपनीमध्ये रिलायन्सची हिस्सेदारी 70 टक्के इतकी असणार असून 30 टक्के उर्वरित हिस्सेदारी ही मेटा प्लॅटफॉर्म इंक यांच्या अंतर्गत येणाऱ्या फेसबुक यांच्याकडे राहणार आहे. रिलायन्सच्या एआय युनिटने सुरुवातीला दोन कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. एआय संबंधीत प्रणालीचा अवलंब करत कंपनी विक्री, विपणन, आयटी ऑपरेशन्स, ग्राहक सेवा यांच्याबाबतीत तिचा वापर करणार आहे.