रिलायन्स बंगालमध्ये 20 हजार कोटींची करणार गुंतवणूक
अतिरिक्त गुंतवणुकीची मुकेश अंबानी यांची सातव्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये घोषणा
कोलकाता
: मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीजने पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत सुमारे 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की त्यांची कंपनी पुढील तीन वर्षांत पश्चिम बंगालमध्ये 20,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक किरकोळ, दूरसंचार आणि जैव-ऊर्जा क्षेत्रात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सातव्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये अंबानी म्हणाले, ‘आम्ही पुढील तीन वर्षांत 20,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत. ही गुंतवणूक दूरसंचार, रिटेल आणि जैव-ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. बंगालच्या विकासात रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही असाही विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला आहे.
अंबानी म्हणाले की, रिलायन्सची दूरसंचार शाखा जिओ 5जी राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जात आहे, विशेषत: ग्रामीण भागांना जोडत आहे. बंगालचा बहुतांश भाग त्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योगासह शेती क्षेत्राला देणार उभारी
शेकडो लघु आणि मध्यम उद्योग आणि बंगालचे सुमारे 5.5 लाख किराणा दुकानदार आमच्या किरकोळ व्यवसायाशी संबंधित आहेत. नवीन दुकाने उघडल्याने त्यांना फायदा होईल. रिलायन्स पुढील तीन वर्षांत 100 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट उभारणार आहे जिथे 55 लाख टन कृषी अवशेष आणि सेंद्रिय कचरा वापरला जाईल. यामुळे सुमारे 20 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि दरवर्षी 25 लाख टन सेंद्रिय खत तयार होणार असल्याचीही माहिती अंबानी यांनी यादरम्यान दिली आहे.