‘रिलायन्स’ सर्वाधिक संपत्ती निर्मितीत अव्वलस्थानी
सलग पाचव्यांदा कामगिरी : पाच वर्षात 9.63 लाख कोटी जोडले : मोतीलाल ओसवालच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही पाच वर्षांच्या कालावधीत (2018-2023) सलग पाचव्यांदा गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे. मुंबईस्थित ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने 14 डिसेंबर रोजी सादर केलेल्या 28 व्या वार्षिक संपत्ती निर्मिती अभ्यास अहवालात ही माहिती दिली आहे. मोतीलाल ओसवाल म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीजने 2018 ते 2023 या कालावधीत (31 मार्च 2023 पर्यंत) 9.63 लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. या अहवालानुसार, यादीतील शीर्ष 100 कंपन्यांनी तयार केलेल्या एकूण संपत्तीमध्ये रिलायन्सचे योगदान 13.7 टक्के आहे.
सर्वाधिक संपत्ती निर्मितीच्याबाबतीत टीसीएस दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स व्यतिरिक्त, सर्वाधिक संपत्ती निर्मितीच्या बाबतीत टॉप 5 कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफाही दिला आहे.
अन्य कंपन्यांचाही समावेश
यानंतर संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या 5 कंपन्या आहेत. येथे संपत्ती निर्मिती म्हणजे गेल्या पाच वर्षांत कंपन्यांच्या बाजारभांडवलामध्ये झालेली वाढ होय.
गुंतवणूकदारांना 123 टक्के परतावा
अहवालानुसार, रिलायन्स समूहाने गेल्या 17 वर्षांत दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या सर्वात मोठ्या संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत 10 वेळा क्रमांक-1 स्थान प्राप्त केले आहे. तथापि, 2023 मध्ये आरआयएलचे शेअर्स आतापर्यंत 4.5 टक्क्यांनी घसरले आहेत आणि गेल्या वर्षी सुमारे 6 टक्के घसरले होते. गेल्या 5 वर्षांत, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 123 टक्के परतावा दिला आहे. हे दशक रिलायन्ससाठी बदलाचे दशक ठरले आहे.