रिलायन्सने तिमाहीत कमावला विक्रमी महसूल
महसूल 28 टक्के वाढीसोबत 3.62 लाख कोटींवर
वृत्तसंस्था, मुंबई
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कमाईमध्ये विक्रम केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीचा परिचालन महसूल मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 28 टक्के अधिक दिसून आला आहे.
कंपनीने जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये 28 टक्के वाढीसह 3.62 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच समान अवधीमध्ये 2.83 लाख कोटी रुपये इतका महसूल प्राप्त करण्यात आला होता.
किती मिळवला नफा
याच दरम्यान कंपनीने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत 29550 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 34 टक्के वाढ पहायला मिळाली. मागच्या वर्षी याच अवधीत 22092 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. ऑईल ते केमिकल व्यवसायामध्ये कंपनीने केलेले चांगले प्रदर्शन नफा व महसूल वाढीसाठी कारणीभूत ठरले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे कंपनीला फायदा झाला आहे.
विविध कंपन्यांनी मिळविलेला नफा
कंपनीअंतर्गत दूरसंचार कंपनी जिओसह विविध व्यवसायांनी नफा चांगला मिळवला आहे. जिओ प्लॅटफॉर्म कंपनीने नफ्यामध्ये 14 टक्के इतकी वाढ नोंदवली असून 7379 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. ऑईल व गॅस व्यवसायाने 6020 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ऑईल ते केमिकल व्यवसायाने 2.32 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करून दिला आहे. मागच्या वर्षी हाच महसूल 1.61 लाख कोटी रुपयांचा होता. म्हणजेच यंदा महसुलामध्ये 44 टक्क्यांची दमदार वाढ या व्यवसायाने नोंदवली आहे. कंपनीच्या रिटेल व्यवसायाच्या महसूल 91717 कोटी रुपयांचा नोंदवला गेला. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये महसुलात नाममात्र 1.29 टक्के वाढ नोंदवली.
डिजीटल सेवा व्यवसायाने 11 टक्के वाढीसोबत 48486 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करून दिला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 43617 कोटी रुपयांचा महसूल व्यवसायाने मिळवून दिला होता. इतर व्यवसायांनी 16208 कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळवून दिला आहे. हा महसूलसुद्धा यंदा 56 टक्के इतका अधिक आहे.
समभाग वधारला
रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी कंपनीचा समभाग दमदारपणे तेजीत असताना दिसला. सोमवारच्या सुरुवातीच्या सत्रात रिलायन्सचा समभाग 6.6 टक्के वाढत 1242 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी हा समभाग 1164 रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी सरतेशेवटी 11 टक्के वाढत समभाग 1300 रुपयांवर बंद झाला. रिलायन्सच्या समभागांची यावर्षीची एकंदर कामगिरी तशी निराशाजनक राहिली आहे. यावर्षी हा समभाग 26 टक्के घसरला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये समभाग 2 टक्के तर एक महिन्यात 3 टक्के आणि 6 महिन्यांमध्ये 19 टक्के घसरला आहे.
