भात पिकासाठी टँकरच्या पाण्याचा आधार
मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही तालुक्यात अद्याप पाऊस नाही : बळीराजा संकटात
वार्ताहर/किणये
मृग नक्षत्राला दि. 8 रोजीपासून सुरुवात झाली आहे. मात्र तालुक्यात अद्याप पाऊस नाही. यामुळे भात पेरणी केलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. यंदा अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र नक्षत्राचा पाऊस अद्यापही सुरू झाला नाही. गेला पाऊस कुणीकडे, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या पाऊस नाही. कडक ऊन आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम साधायचा कसा, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी गेल्या दहा-बारा दिवसापूर्वीच धूळवाफ पेरणी केली आहे. ही पेरणी केलेली भातपिके जमिनीतून उगवून आलेले आहेत. मात्र सध्या मृग नक्षत्राचा पाऊस नाही. यामुळे या भात पिकाला काही शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेऊन देत आहेत.
तालुक्यातील काही शेतकरी भातरोप लागवड करतात. या रोप लागवडीसाठी शेतकऱ्यांनी शिवारात भाताची पेरणी केली आहे. या रोप लागवडीच्या भातालाही पाणी देणे मुश्किल झाले आहे. बेळगुंदी भागातील शेतकरी टॅंकरने विकत पाणी घेऊन भात पिकं जगवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. पावसाने अशीच पाठ फिरवली तर उगवून आलेले भात पीक सुकून जाणार आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. यंदा अधूनमधून अवकाळी दमदार पाऊस झाला. तसेच मान्सूनपूर्व पाऊसही बऱ्यापैकी झाला. यामुळे शिवारातील मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कोणत्या शिवारात कोणती पिके घ्यावयाची याचे नियोजन केले.
शिवारातील मशागत केली. मात्र मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठ दिवस झाले तरी पाऊस आला नाही. यामुळे आता खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करायचे कसे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ऐन मृग नक्षत्राच्या काळात कडक ऊन आहे. तसेच उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. विहिरी व शिवारातील कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. आता पेरणी केलेल्या भातपिकाला शेतकऱ्यांना टँकरच्या पाण्याचाच पर्याय आहे. मात्र एका टँकरला 350 ते 500 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. मग टँकरने पाणी देऊन शेतकऱ्यांना शेती परवडणारी आहे का? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. कारण शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळेल याची शाश्वती नसते आणि भात पीक घेण्यासाठी टँकरला पैसे मोजावे लागत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास शिवारात उगवून आलेले भातपीक सुकून जाणार व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. खरीप हंगाम साधण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.
वरुणराजा शेतकऱ्यांवर कृपा कर!
सध्या पाऊस नाही शिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीने तळ गाठलेला आहे. आमच्या भागातील मार्कंडेय नदी कोरडी आहे. मग भात पेरणी केलेल्या पिकाला पाणी द्यायचे कुठून, याची चिंता आम्हा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. काही शेतकरी टँकरचे पाणी विकत घेऊन भात पिकाला देत आहोत. मात्र विकत पाणी घेऊन पिकाला देणे आम्हा शेतकऱ्यांना परवडणारे आहे का? याची चिंता आम्हाला लागली आहे. वरुणराजा आम्हा शेतकऱ्यांवर कृपा कर, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
-अरुण गुरव, बेळगुंदी
