रिलायन्स इंडस्ट्रीजला 20946 कोटींचा नफा
नफ्यात वार्षिक तत्वावर 22 टक्के घट, महसुलात मात्र वाढ
वृत्तसंस्था, मुंबई
भारतातील सर्वात मोठी उद्योग कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने या अवधीत 20946 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीने 3.12 लाख कोटी रुपयांचा महसुल प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. महसुलात वर्षाच्या आधारावर 25 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. तेल ते रसायन या विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.
एकत्रित निव्वळ नफ्यात वर्षाच्या आधारावर 22 टक्के घसरण झाली आहे. एक वर्षाआधी पाहता कंपनीने 26994 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. पण तिमाही आधारावर मात्र कंपनीने नफ्यात 23 टक्के वाढ केली आहे. एप्रिल जूनच्या तिमाहीत कंपनीने 3.18 लाख कोटी रुपयांचे एकुण उत्पन्न प्राप्त केले आहे. कंपनीच्या दूरसंचार व्यवसायाने 15 टक्के इतकी वाढ नोंदविली आहे. 533 दशलक्ष इतके ग्राहक या कंपनीचे आहेत. रिटेल व्यवसायाने मात्र नफ्यामध्ये यथातथाच कामगिरी नोंदविली आहे. जियो प्लॅटफॉर्मने 11 टक्के वाढीसह तिमाहीत 39,173 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलाय. तर नफा 9टक्के वाढत 7764 कोटींवर पोहचला आहे. याचदरम्dयान रिलायन्स रिटेलने 14 टक्के वाढीसोबत 2806 कोटींचा नफा प्राप्त केला असून कामकाजी महसूल 8 टक्के वाढलेला दिसला आहे.
तिमाहीत 252 स्टोअर्स उघडली
सदरच्या तिमाहीत भांडवली खर्चासाठी 38682 कोटी रुपये कंपनीने खर्च केले आहेत. डिजिटल व्यवसायातही कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. रिटेल व्यवसायाचा विचार करता जून तिमाहीमध्ये जवळपास 252 स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत. एकंदर 20169 स्टोअर्स देशभरामध्ये कंपनीची सुरू आहेत.