‘रिलायन्स’ने बाजारमूल्याचा 20 लाख कोटींचा टप्पा ओलांडला
रिलायन्स ठरली देशातील पहिली कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सने 2,958 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला, ज्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य वाढले आहे.
गेल्या दोन आठवड्यात रिलायन्सचे बाजारमूल्य 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 29 जानेवारीला ते 19 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. यापूर्वी, कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये 15 लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली होती. 2019 मध्ये मार्केट कॅपने 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी
बाजार भांडवलाच्याबाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुंबईस्थित रिलायन्स समूह तेलापासून दूरसंचार आणि रिटेलपर्यंतच्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करतो. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येते. टीसीएसचे मार्केट कॅप 15.07 लाख कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 9.38 लाख कोटी रुपये आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 6.64 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.