विश्वासार्हता, पारदर्शक सेवा ही ‘लोकमान्य’ची वैशिष्ट्यो
खासदार मेधा कुलकर्णी यांचे गौरवोद्गार, कर्वेनगर शाखेचे स्थलांतरण
पुणे : विश्वासार्ह व पारदर्शक सेवा ही ‘लोकमान्य को-ऑप. मल्टिपर्पज सोसायटी’ची वैशिष्ट्यो असून, विकसित भारतासाठीच्या प्रयत्नांमध्ये ‘लोकमान्य सोसायटी’देखील आपली जबाबदारी निभावत असल्याचे गौरवोद्गार राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी येथे काढले. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कर्वेनगर स्थलांतरित शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘लोकमान्य सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास माजी नगरसेविका मंजुषा खर्डेकर, जयंत भावे यांच्यासह कर्वेनगर व कोथरूडमधील विविध ग्राहक-सभासद व मान्यवरांनी हजेरी लावली.
‘लोककल्प फाऊंडेशन’च्या माध्यमातून लोकमान्य समूहाने हाती घेतलेल्या ग्रामविकास प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त करताना मेधाताई पुढे म्हणाल्या की, वाढते शहरीकरण थोपविण्यासाठी अशा प्रयत्नांची व प्रकल्पांची गरज आहे. प्रास्ताविकात डॉ. किरण ठाकुर यांनी ‘लोकमान्य’चा प्रवास मांडीत लोकमान्य करीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमात सुशील जाधव यांनी कर्वेनगर शाखेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विविध संस्थांसोबत करार करून ग्राहक-सभासदांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. तसेच त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ‘लोकमान्य’च्या जुन्या व मान्यवर सभासदांचा डॉ. किरण ठाकुर व मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.