For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदयनिधी स्टॅलीन यांच्या सुटका करा

06:07 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
उदयनिधी स्टॅलीन यांच्या सुटका करा
Advertisement

मद्रास उच्च न्यायालयाचा तामिळनाडूला आदेश

Advertisement

वृत्तसंस्था

चेन्नई

Advertisement

तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन यांची चौकशी झाल्यानंतर त्वरित सुटका करावी, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिला आहे. उदयनिधी स्टॅलीन यांनी एका सभेत अभिनेत्री त्रिशा हिच्या संदर्भात काही वादग्रस्त उद्गार काढल्याने तामिळनाडू सरकारने त्यांना अटक केली आहे. या अटकेविरोधात त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका सादर केली. स्टॅलीन यांची चौकशी मंगळवारीच करावी आणि मंगळवारीच त्यांची सुटका करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे स्टॅलीन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांच्या विरोधात मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने थंजावर पूर्व पोलीस स्थानकात तक्रार सादर केली होती. 3 ऑगस्टला उदयनिधी स्टॅलीन यांच्या जाहीर सभेत ते तामिळनाडू सरकारवर कावेरी जलवितरण धोरणासंदर्भात टीका करत असताना उपस्थितांनी ‘त्रिशा, त्रिशा’ अशा घोषणा दिल्या. त्यावेळी त्यांनी त्रिशा आणि विजय यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे त्रिशा यांचा मानभंग झाला, असा आरोप तक्रारीत आहे. त्यानंतर काही वेळातच उदयनिधी स्टॅलीन यांच्या अटक करण्यात आली आहे.

अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

स्टॅलीन यांच्या अटक करण्यासाठी त्यांच्या ‘नीलांकराई’ या निवासस्थानात पोलीस आल्यानंतर त्वरित स्टॅलीन यांच्या वकीलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज न्यायालयात सादर केला. तथापि, या अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर उच्च न्यायालयात या अटकेविरोधात याचिका सादर करण्यात आली. 3 ऑगस्टलाच या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यात आली. उदयनिधी स्टॅलीन यांची चौकशी पोलिसांनी मंगळवारीच करावी आणि चौकशीनंतर मंगळवारीच त्यांची सुटका करावी. त्यांना पोलीस केठडी किंवा न्यायालयीन केठडीत ठेवण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला.

राज्यसरकारचा युक्तिवाद

स्टॅलीन यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासंबंधीची मागणी करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. त्यांना केवळ चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. न्यायालयानेही तशी कृती टाळण्याचा आदेश सरकारला दिला.

राज्यभर निदर्शने

उदयनिधी स्टॅलीन यांच्या अटकेचे वृत्त पसरताच द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी चेन्नई आणि तामिळनाडू राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरुन निदर्शने केल्याचे वृत्त आहे. अनेक स्थानी रास्ता रोको करण्यात आला. माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी पक्षाच्या मुख्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. या प्रकरणात पुढे कोणती कृती करायची, यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली. 5 ऑगस्टपासून तामिळनाडू विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्द्यावर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांची टीका

जाहीर सभेत मी मुख्यमंत्री विजय यांचे नाव सोडून अन्य कोणाचेही नाव घेतले नव्हते. तरीही मला अटक करण्यात येत आहे. राज्ययंत्रणा कशा प्रकारे चालविली जात आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. न्यायालयात मला निश्चितच न्याय मिळेल, असे प्रतिपादन स्टॅलीन यांनी त्यांना अटक करण्यासाठी पोलीस आले असताना केले. राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकशाहीचा विजय

ड मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एम. के. स्टॅलीन यांची प्रतिक्रिया

ड मंगळवारी चौकशी पूर्ण करुन उदयनिधी स्टॅलीन यांना सोडण्याचा आदेश

ड अभिनेत्री त्रिशा यांच्यासंबंधी कथित वादग्रस्त विधान केल्याने त्यांना अटक

ड तामिळनाडूत अनेक स्थानी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

Advertisement

.