For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बर्च’प्रकरणाचा चौकशी अहवाल उघड करा

12:18 PM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘बर्च’प्रकरणाचा चौकशी अहवाल उघड करा
Advertisement

विरोधकांची विधानसभेत मागणी : सभापतींच्या समोर येत नोंदवला निषेध,जबाबदार मंत्र्याला त्वरित हटवा,प्रकरण सीबीआयकडे द्या

Advertisement

पणजी : हडफडे ‘बर्च’ अग्नितांडव प्रकरण सीबीआयकडे देऊन दंडाधिकारी चौकशी अहवाल उघड करा आणि विधानसभेत मांडा, अशी मागणी करीत विरोधी आमदारांनी सभापती गणेश गांवकर यांच्यासमोरील हौदात निषेध नोंदवला तसेच घोषणाबाजी केली. नंतर ते खाली बसले आणि प्रश्नोत्तर तास संपेपर्यंत त्यांनी निषेध करुन वरील मागणी लावून धरली. शिवाय संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असेही त्यांनी बजावले. ‘बर्च’ प्रकरणातील पुढे ढकलण्यात आलेला आमदार कार्लुस फरेरा यांचा प्रश्न काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चर्चेला आला.

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आतापर्यंत झालेल्या कारवाईची माहिती दिली. त्याने विरोधी आमदारांचे समाधान झाले नाही. या घटनेची राजकीय जबाबदारी निश्चित करा. संबंधित मंत्री त्यास जबाबदार असून त्याला त्वरित हटवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली. दंडाधिकारी अहवाल लपवून का ठेवता? तो उघड करा असे आमदार व्हेन्झी व्हिएगश म्हणाले. हे प्रकरण गंभीर असून सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, असा आग्रह विरोधी आमदारांनी धरला.

Advertisement

चौकशी अद्याप सुरु : मुख्यमंत्री

या प्रकरणात कोणाचीही राजकीय जबाबदारी नसल्याचे सांगून डॉ. सावंत म्हणाले की, त्यात जो कोणी गुंतलेला आहे त्याच्यावर चौकशी संपल्यानंतर जबाबदारी निश्चित होईल. बर्च क्लब प्रथम कोणी सुरु केला? बांधकाम कोणी केले? त्यास अनुमती कोणी दिली? याची चौकशी चालू असून ते सर्व दंडाधिकारी अहवालात समाविष्ट करतो, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

पुढील अधिवेशनात अहवाल सादर करतो : मुख्यमंत्री

बर्च घटनेनंतर उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही जिह्यातील मिळून 86 क्लबांची तपासणी करण्यात आली असून योग्य ते परवाने नसल्याने 22 क्लबांना टाळे ठोकण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दंडाधिकारी चौकशी अहवालाची मागणी विरोधी आमदारांनी पुन्हा-पुन्हा केली. त्यात मंत्री गुंतलेले आहेत म्हणून तो अहवाल लपवता असा आरोप विरोधकांनी केला. आरोप निश्चित झाले की पुढील विधानसभा अधिवेशनात अहवाल सादर करतो, असे डॉ. सावंत म्हणाले. विरोधकांचे वरील उत्तरांनी समाधान न झाल्यामुळे त्यांनी सभापतींसमोर जाऊन निषेध केला आणि ते खाली बसले. पुढील प्रश्न सरदेसाईंचा असल्यामुळे ते जागेवर गेले आणि प्रश्न मांडला. इतर विरोधकांनी निषेध चालू ठेवला आणि प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर तो संपुष्टात आला.

Advertisement
Tags :

.