कतारकडून नौदल अधिकाऱ्यांची सुटका
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश, 7 जण परतले भारतात, व्यक्त केली कृतज्ञता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंड ठोठावण्यात आलेल्या 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका कतारकडून करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी 7 जण आता भारतात परतले असून त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांसंबंधी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्यामुळेच आमची सुटका होऊ शकली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांच्या सुटकेसंबंधी माहिती दिली आहे.
या अधिकाऱ्यांच्या सुटकेचे भारताने मन:पूर्वक स्वागत केले आहे. सुटका करण्यात आलेले आणखी एक अधिकारी अद्याप कतारमध्येच असून त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने सर्व सज्जता करण्यात आली आहे, अशी माहितीही परराष्ट्र विभागाने दिली. काही व्यक्तिगत कारणांसाठी हे अधिकारी अद्याप कतारमध्येच वास्तव्यास असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेचा निर्णय कतारच्या अमीरांनी त्यांच्या अधिकारात घेतला आहे.
काय आहे प्रकरण ?
गेल्या ऑक्टोबर महिन्यात कतार येथे भारताच्या आठ निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. हे अधिकारी कतारच्या नौदल सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘दाहरा ग्लोबल कंपनी’ च्या माध्यमातून तेथे गेले होते. तथापि, अचानकपणे त्यांना अटक करण्यात आली. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांना अटक केल्यानंतर तेथील स्थानिक न्यायालयात त्यांच्यावर अभियोग चालविण्यात आला. न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले होते. आपल्याला बचावाची संधीही देण्यात आली नाही, असे त्यांनी नंतर स्पष्ट केले होते. अरबी भाषेत न्यायालयाचे कामकाज चालल्याने, तसेच ही भाषा आपल्याला येत नसल्याने न्यायालयीन प्रक्रियेसंबंधी आपण अनभिज्ञ होतो, असेही स्पष्टीकरण या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताने प्रथमपासूनच प्रयत्न चालविले होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
भारताचे प्रयत्न
अधिकाऱ्यांना अटक करताच भारताकडून सुटकेसाठी विविध मार्गांनी प्रयत्नांना प्रारंभ करण्यात आला होता. मुत्सद्देगिरीच्या मार्गाने कतारच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कतारच्या मुख्य अमीरांशीही उच्च पातळीवरुन चर्चा करण्यात आली. याचा परिणाम म्हणून या अधिकाऱ्यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला तेथील ज्येष्ठ न्यायालयाने काही काळापूर्वी स्थगिती दिली होती आणि या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केले होते. आता ही शिक्षाही रद्द करण्यात आली असून सर्व आठ अधिकाऱ्यांची कारागृहातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचे प्रयत्न निर्णायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांची कतारच्या अमीरांशी भेट झाली होती. या भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांची सुटका करण्याचा मुद्दा प्राधान्याने लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या भेटीनंतरच अधिकाऱ्यांची सुटका करण्याचा अंतिम निर्णय कतारने घेतला. अशा प्रकारे हे प्रकरण हातावेगळे करण्यात आले.
भारत-कतार संबंधांचा परिणाम
भारताचे प्रारंभापासूनच कतार या तेल आणि वायूसमृद्ध देशाशी जवळचे संबंध आहेत. अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याच्या घटनेनंतर या संबंधांमध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. तथापि, दोन्ही देशांनी संयमाने आणि सामोपचाराने प्रकरण हाताळल्याने सन्माननीय तोडगा निघण्यास मोठे साहाय्य झाले आहे. भारताने वेळेवर पावले उचलल्याने गंभीर वळण लागण्याअगोदरच दोन्ही देशांच्या दृष्टीने योग्य असा उपाय शोधण्यात येऊन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली. हा दोन्ही देशांच्या संयमित धोरणाचा विजय असल्याची प्रतिक्रिया तज्ञांनी दिली आहे.