हिंडलगा कारागृहातील 14 कैद्यांची सुटका
वागणुकीत सुधारणा झाल्याने कारागृह प्रशासनाकडून शिफारस
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 14 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. वागणुकीत सुधारणा झाल्यामुळे राज्य सरकारच्या आदेशावरून त्यांची सुटका झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी सर्व 14 कैद्यांना सुटका झाल्यासंबंधी प्रमाणपत्र दिले. वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात शिक्षा झालेले व वागणुकीत सुधारणा झालेल्या 14 कैद्यांची निवड झाली आहे. यासाठी कारागृहाच्या सल्लागार मंडळानेही शिफारस केली होती.
तब्बल 14 वर्षे शिक्षा पूर्ण केलेल्या व वागणुकीत सुधारणा झालेल्या कैद्यांना टेलरिंग, विणकर विभाग, गार्मेंट्स, सुतारकाम, बागायत, किचन आदी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली आहे. कळत नकळत आपल्या हातून एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये, तुमची वागणूक लक्षात घेऊन सरकारने तुमची सुटका केली आहे. यापुढे समाजात एक उत्तम नागरिक म्हणून कुटुंबासमवेत व समाजासोबत जीवन जगावे, असा सल्ला कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना दिला. यावेळी साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, जेलर राजेश धर्मट्टी, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.