मोहम्मद झुबेरची तत्काळ सुटका करा!
सर्वोच्च न्यायालय : सहा गुन्हय़ांमध्ये अंतरिम जामीन : सर्व खटले दिल्लीत चालणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशमध्ये दाखल असलेल्या सर्व 6 गुह्यांमध्ये झुबेरला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात नोंदवलेले सर्व गुन्हे एकत्र करून त्यांची एकत्रित चौकशी करण्यात यावी, असेही ते म्हणाले. सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्याचे निर्देशही न्यायालयाने बुधवारी दिले. झुबेरविरुद्ध नोंदवलेल्या पुढील सर्व एफआयआरची चौकशी दिल्ली पोलीस करतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने झुबेरला त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. झुबेरला 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात जामीनपत्र भरावे लागणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कर्मचाऱयांना लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेशही दिले होते. तसेच पत्रकाराने काय लिहावे किंवा लिहू नये, हे न्यायालयाने कसे सांगायचे? असेही स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी न्यायालयात उत्तर प्रदेश पोलिसांनी झुबेर पत्रकार नसून तो केवळ तथ्य तपासनीस असल्याचा दावा केला होता.
झुबेरवर एकूण 7 एफआयआर
झुबेरविरुद्ध एकूण 7 एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी 6 उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली, सीतापूर, हाथरस आणि लखीमपूर येथे दाखल गुह्यांमध्ये तो कोठडीत आहे. 2018 च्या ट्विट प्रकरणात झुबेर जामिनासाठी दिल्ली न्यायालयात पोहोचला होता, परंतु धार्मिक भावना दुखावल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या हाथरस न्यायालयाने 14 जुलै रोजी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार झुबेरला 27 जुलैपर्यंत तुरुंगात राहायचे होते. झुबेर सध्या हाथरस येथे न्यायालयीन कोठडीत आहे.