For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी घातलेल्या अटी शिथिल करा

10:39 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी घातलेल्या अटी शिथिल करा
Advertisement

मजगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढून बांधकाम कामगारांचे निवेदन 

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी कामगार खात्याकडून घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. पूर्वीप्रमाणे नोंदणीसाठी सुलभ प्रक्रिया राबविण्यात यावी. या प्रमुख मागणीसह बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कामगार खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ त्वरित करून देण्यात यावा, या मागणीसाठी कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली मजगाव येथील कामगार खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना कामगार खात्याकडे नोंदणी करण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची जाचक अट घालण्यात आली आहे. अशिक्षित असणाऱ्या कामगारांना नोंदणी करण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी तसेच कामगार खात्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. आधीच निरक्षर असणाऱ्या कामगारांना या अटी जाचक ठरणाऱ्या आहेत. यामध्ये बदल करण्यात यावा व पूर्वीप्रमाणे कामगारांना नोंदणी करण्यासाठी सुलभता आणावी. त्वरित नोंदणीकरणाची सोयही करून देण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कामगार खात्याकडे नोंद असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी कामगार खात्याकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी. शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व्हे व तांत्रिक कारणांमुळे अर्ज करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. यासाठी थेट अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. कामगारांच्या मुलांसाठी लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 50 हजारांची मदत देण्यात यावी. निवेशन खरेदी करण्यासाठी 5 लाखांपर्यंतची मदत देण्यात यावी. रोजगार हमीमध्ये 50 दिवस काम केलेल्या कामगारांना कामगार ओळखपत्र वितरण करण्यात येत होते. यानुसार योजनांचाही लाभ करून देण्यात येत होता. मात्र 2019 पासून रोजगार हमी योजनेतील कामगारांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी. कामगार सेवा केंद्रे सुरू करण्यात यावीत, नव्याने नोंदणी करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी रद्द करण्यात याव्या. अटी घातलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन सादर करण्यात आले. कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कामगारांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.