नाते दोघांचे...
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मिनलच्या मनाची घालमेल, पतीच्या अचानक निघून जाण्याने तिला होणारं दु:ख, एक प्रकारचं आलेलं पोरकेपण सारं पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होतं. मनात घट्ट रुतून बसलेल्या गोष्टी दूर करायला थोडा वेळ तर जाणारच होता. अचानक आलेलं सकंट, त्याचं कायमचं निघून जाणं..त्याला मी खूप गृहीत धरलं हे सतत जाणवणं पुन्हा पुन्हा वर येत होतं. वेगवेगळ्या मानसोपचार तंत्रांचा उपयोग करत हळूहळू मिनल यातून बाहेर पडली.
मित्रमैत्रिणींनो..पती आणि पत्नी हे नातं इतर नात्यापेक्षा खूप वेगळं नातं असतं. किती काळ एकत्र प्रवास केल्यानंतर ‘मी’ आणि ‘तू’ चे ‘आपण’ होणार हे सांगणं थोडं अवघड आहे. हे नाते कोणता आकार धारण करते हे त्या जोडप्यावरच अवलंबून असते. खरंतर त्या दोन व्यक्तींमध्ये नाते सहवासाने, एकमेकांना समजून घेत घेत आकार घेत हळूहळू दृढ होते.
सुरवातीचा काही काळ एकमेकांना नीट ओळखण्यात जातो. हळूहळू दोघांनाही आपण जिच्याशी वा ज्याच्याशी लग्न केले आहे त्याची वा तिची खरी ओळख पटायला लागते. ‘लग्न’ म्हणजे नेमकं काय, संसार करणं, नातं निभावणं म्हणजे काय याची बऱ्यापैकी समज यायला लागते. एका छपराखाली पाहिलेले अनेक उन्हाळे, पावसाळे दोघांनाही पुष्कळ शहाणपणं शिकवतात. हळूहळू एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारण्याचं तंत्र गवसू लागतं. पूर्वीसारखी समज गैरसमाजाची वादळं उठत नाहीत. हळूहळू मुरलेल्या लोणच्यासारखं हे नातं आयुष्याची चव वाढवू लागतं. दोन व्यक्तींमध्ये-आणि त्यातूनही नवरा बायकोमध्ये मतभेद अपरिहार्यच आहेत. सदैव..अखंड एकमेकांच्या पावलावर पाऊल टाकुन विनातक्रार चालत रहाणं हे केवळ अशक्य तर आहेच, पण अनैसर्गिकही आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र येऊन संसार सुरु होतो. एकत्र आलेल्या त्या दोन व्यक्तींचे संगोपन, संस्कार वेगवेगळे, त्यांना उपलब्ध असलेली परिस्थिती वेगवेगळी..या घटकांनुसार त्या माणसाच्या विचारांची एक चौकट तयार होत असते. त्यामुळे एक व्यक्ती शंभर टक्के दुसऱ्यासारखीच असणे अशक्य आहे. आपल्या सर्व गोष्टी, स्वभाव जुळायलाच हवेत या अपेक्षा थोडी बाजूला ठेऊन पती-पत्नीचे नाते सुदृढ राहण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवेत. आश्वस्त करणाऱ्या आधारावर हे नाते टिकून राहते. एकमेकांना समजून घेऊन एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिची वा त्याची आवड-निवड, एखादी गोष्ट वेगळी असू शकते हे स्विकारुन पुढे जाणाऱ्या जोडप्याचे नाते सुदृढ असते. कितीही अडचणी आल्या, आपत्ती आली, थकलो, हरलो तरी घरी वाट पाहणारे आपले माणूस आहे. जे आपल्यासोबत उभे आहे हा भक्कम भावनात्मक आधार वैवाहिक नात्यामध्ये फार गरजेचा असतो.
वैवाहिक नाते कोणते रुप धारण करते हे पूर्णपणे त्या जोडप्यावर अवलंबून असते. एक छोटंसं उदाहरण पाहुया.. आपण नवीन रोप लावल्यावर त्याची काळजी घेतो. ती रोपं छान वाढावी, बहरावी यासाठी त्यांना वेळच्यावेळी पाणी देणं, स्वच्छ सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचू देणं, कुठे तण उगवले तर ते वेळीच काढून टाकणं हे लक्षपूर्वक करतो ना, अगदी तसंच सुरवातीच्या काळात नात्याच्या जोपासनेसाठी जितकी काळजी घ्याल तितके पुढे येणारे दिवस सुखाच्या पालवीने बहरुन जातील. जसजसे हे नाते आकार घेत जाते तशी त्या नात्याविषयीची समज वाढू लागते. हळूहळू काही गोष्टी आपण सोडून द्यायला शिकतो. विविध प्रसंगातून आपण वाटही शोधतो. अडचणीतून अचूक वाट काढण्याच्या कौशल्यावर बऱ्याचदा यशस्वी लग्नाचा डोलारा उभा असतो. लग्न केलं की ते आपोआप यशस्वी होत नाही. केलेलं लग्न यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची, वेळेची, संयमाची गुंतवणूक करावी लागते. परिस्थिती बदलते तसा मानसिक-भावनिक गरजांचा पोतही बदलतो. एकमेकांना ऐकुन घेणं, समजून घेणं..त्यासाठी वेळ देणं हे खूप आवश्यक असतं. कोणतेही नाते नाही ज्यामध्ये वाद विवाद होणारच नाही, सारे काही एकमतानेच होईल वगैरे..दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात.
आदर्श नवरा बायको किंवा आदर्श जोडपं असं काही नसतं. कुणालाही विचारुन पहा, वैवाहिक नात्यामध्ये मतभेद आलेच, तडजोड आली, काहीवेळा नकोच हे नातं असं वाटावं असे क्षणही आले आणि काहीवेळा आपला नवरा किंवा बायको हे जगातले सर्वोत्तम असावेत असे वाटणारेही क्षणही आले. खरंतर तुम्ही ‘मेड फॉर इच अदर पेक्षा’ ‘मोल्ड फॉर इच अदर’ किती होताय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मध्यरात्री आधारासाठी कुणाला हाक मारावी आणि समोरच्याने ओ द्यावी इतके आश्वासक नाते असते हे! मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे स्त्राr आणि पुरुष ही वैवाहिक नात्याची, संसाराची दोन चाकं असतात. एक लक्षात घ्यायला हवे की कुणी कमी वा अधिक असे नसतेच मुळी!! परस्परांनी एकमेकाला समजून घ्यायला हवं. पत्नी म्हणजे सतत राबणारं यंत्र नव्हे आणि पती म्हणजे केवळ एटीएम् कार्ड नव्हे हे दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. आनंदाच्या क्षणांची साठवणूक करायला हवी आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद, सुख शोधता यायला हवं. केवळ पती-पत्नी या नात्यातच नव्हे पण आपण सगळेच एकमेकांना खूप गृहित धरतो. एक लक्षात घ्यायला हवे की आपण कुणीच अमरत्वाचा पट्टा घेउन इथे आलो नाही. जे आज आहे ते उद्या नाही हे कधीही होऊ शकतं. आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे आहे तो क्षण कसा चांगला करता येईल याची काळजी घेणं!! ते करता आलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र खरे!!
-अॅड. सुमेधा संजिव देसाई