लक्ष्मीपुरी बाजारपेठेत दुर्गंधीचे साम्राज्य
कोल्हापूर :
शहरातील प्रमुख असणाऱ्या लक्ष्मीपुरी बाजापेठेतील रस्त्यावरून 24 तास गटर व डेनेजचे पाणी वाहत आहे. येथील सखल भागात पाणी साचले असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विक्रेत्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दिवसभर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ढासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विक्रेत्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी याठिकाणी कारवाई करण्यास येतात. तसेच कर वसुलीसाठी रोज कर्मचाऱ्यांची ये जा सुरू असते. मात्र त्यांना घाणीचे पसरलेले साम्राज्य दिसत नाही का? प्रश्न विक्रेत्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यांच्याकडे तक्रार केली असता. हे आमचे काम नव्हे. संबंधित विभागाला तकार द्या, अशी बतावणी विक्रेत्यांना करून निघून जातात. त्यामुळे मनपा कर्मचारी केवळ कारवाई व वसुलीमध्येच धन्यता मानत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- डासांचा प्रादुर्भाव वाढला
येथील सखल भागात गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहीले आहे. गेल्या वर्षभरापासुन ही स्थिती आहे. पाणी काळेकुट्ट झाले असुन याठिकाणी डासांची पैदास वाढत आहे. यामुळे साथीचे रोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी जाण्यास मार्गच नसल्याने एकाच ठिकाणी साचून राहत आहे.
- पावसापुर्वीच नाले सफाई आवश्यक
येथील गटर तुंबल्याने पाणी पुढे सरकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला आहे. महापालिकेतर्फे नाले सफाईचा केवळ दिखावाच केला जात आहे. काही दिवसातच पावसाला सुरूवात होणार आहे. यापुर्वी येथील नाले सफाई करण्याची गरज आहे.
- नालेसफाई पुर्वीच केला रस्ता : मनपाचा अजब कारभार
याठिकाणी नालेसफाई झाली नसल्याने गटर तुंबत आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत. नालेसफाई करण्यापूर्वीच काही दिवसापूर्वी याठिकाणी नवीन रस्ता केला आहे. यामुळे महापालिकेचा अजब कारभार पहावयास मिळाला आहे.