For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या ट्रम्पला आवरा!

06:59 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
या ट्रम्पला आवरा
Advertisement

भा  ‘युद्धस्य कथा रम्य:’ असे म्हटले जाते. युद्धाच्या कथा रमणीय असतात. संजयने धृतराष्ट्राला महाभारतातील युद्धाची सविस्तर माहिती कथन केली होती. युद्धभूमीवर जे काय चालू होते ते संजयला दिसत होते आणि तो ती माहिती धृतराष्ट्राला सातत्याने देत होता. आज आपल्याला विविध जागतिक स्तरावरील वृत्तवाहिन्यांमधून युद्धाच्या बातम्या पाहायला मिळतात. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व काही क्षम्य असते असेही म्हटले जाते, परंतु सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही युद्धाच्या नावाखाली चालविले आहे, ते कोणालाही सहन होण्यासारखे नाही. खुद्द अमेरिकन नागरिकांना देखील ते पसंत पडलेले नाही. त्यामुळेच अमेरिकेचे सुमारे 80 लाख नागरिक थेट रस्त्यावर उतरले. सध्याचे इराणवर लादलेले युद्ध हे कोणाला परवडणार! खुद्द अमेरिकेला देखील ते परवडत नाही, सध्याच्या या युद्धामुळे व ट्रम्प यांच्या हट्टापायी आखाती राष्ट्रांना ऊ. 18 लाख कोटींचे नुकसान झालेले आहे. अमेरिकेला नेहमीप्रमाणे वाटत होते की आपल्याला इतर राष्ट्रे साथ देतील आणि अमेरिकेने सर्वांनाच गृहित धरले होते. परंतु जागतिक स्तरावर वाढता पेचप्रसंग, अनेक राष्ट्रे सध्या इंधनाच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेली आहेत. महागाईने तर कळस गाठलेला आहे, आखाती राष्ट्रांमध्ये जनता सुखाने चार घास खाऊ शकत नाही. इराणमध्ये तर भूकंपग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धामुळे कधी कुणाचा बळी जाईल, हे कळत नाही, अशी बिकट अवस्था झालेली आहे. त्यातच इंधनांचे भाव प्रचंड वाढत गेल्याने, शिवाय इंधनाचा तुटवडाही वाढत असल्यामुळे गरीब राष्ट्रे भरडून निघत आहेत. युद्ध, इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिका यांचे. मात्र त्याची झळ भारतासह अनेक राष्ट्रांना बसलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार कोसळत आहे. एवढेच नव्हे तर कालच एका आंतरराष्ट्रीय कंपनीने पहाटे सहा वाजता एक आदेश जारी करून तीस हजार कर्मचाऱ्यांना क्षणार्धात काढून टाकले. जागतिक स्तरावरची अर्थनीती बिघडत गेलेली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचत आहे. अशावेळी वीस वर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील एका क्षणामध्ये सदर कंपनीने काढून टाकले. त्यात बारा हजार भारतीय नागरिकांचा समावेश आहे. ताज्या अहवालानुसार 195 राष्ट्रे इंधनाच्या तुटवड्यामुळे हैराण झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नाटो’ या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने अमेरिकेला युद्धासाठी मदत करायची नाही, असा योग्य निर्णय घेतला. मात्र त्यातून ट्रम्प यांनी धडा न घेता नाटो संघटनेमध्ये जी राष्ट्रे आहेत, त्या सर्वांनाच धडा शिकवण्याची भाषा सुरू केली. ट्रम्प यांनी म्हटले आहे की आतापर्यंत अमेरिकेने नेहमीच नाटोमधील राष्ट्रांना मित्रत्वाच्या नात्याने मदत केली होती. संकटकाळी त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिलो होतो. परंतु आता आपण कोणालाही मदत करणार नाही. यावरून अमेरिका हतबल झाल्याचे दिसून येते. अनेक राष्ट्रे इराणच्या बाजूने उभी राहू लागली आहेत. इस्रायलमध्ये इराणने जबरदस्त अण्वस्त्रांचा मारा केलेला आहे. त्यात इस्रायलचे प्रचंड नुकसान झालेले आहे. युद्धातून माघार घेण्यासाठी अमेरिका आता वेगवेगळी नाटके करू लागली आहे. प्रत्यक्षात ही नाटके केवळ ट्रम्प हेच करीत आहेत आणि त्यातून बुधवारी त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी जोपर्यंत खुली करणार नाही, तोपर्यंत इराणसोबत कोणतीही चर्चा करणार नाही व युद्ध थांबणार नाही, अशी घोषणा केली आहे. इराणमध्ये दहा लाख सैनिक घुसविण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. दुसऱ्या बाजूने शस्त्रसंधी करण्याची भाषा बोलत आहे. त्यामुळे युद्धातील क्षणोक्षणी येणाऱ्या बातम्यांमध्ये किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न ट्रम्पमुळे निर्माण होतो. ट्रम्प यांना हे युद्ध चालू ठेवायचे आहे, मात्र त्यातून पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.