देवगडात चक्रीवादळ विषयावर रंगीत तालीम
देवगड/वार्ताहर
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार देवगड तालुक्यामधील स. ह. केळकर महाविद्यालय येथे आज चक्रीवादळ या विषयावर रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील आनंदवाडी गावाची रंगीत तालीमसाठी निवड करण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्रीवादळ रंगीत तालीम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी देवगड तहसीलदार रमेश पवार तसेच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, आरोग्य विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड अधिकारी, देवगड नगरपंचायत तसेच विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. चक्रीवादळामध्ये नागरिकाना सुरक्षित स्थळी कशाप्रकारे हलविण्यात यावे याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन या रंगीत तालीम मधून दाखविण्यात आले. आनंदवाडी ही वाडी देवगडच्या समुद्रकिनारी असल्यामुळे समुद्रामध्ये असलेल्या मच्छीमारांना किनारी आणण्यासाठी बोटीच्या साह्याने पथकाने प्रात्यक्षिक दाखवून कार्यवाही केली. तसेच चक्रीवादळामध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर आरोग्य विभागाच्या विभागाच्यावतीने उपचार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वादळामध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडतात अशावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही प्रात्यक्षिक सादर केले. सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्गाने या रंगीत तालमीमध्ये सहभाग घेतला होता. एनएसएसचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक, सागर सुरक्षा दल आदी विभागाचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. चक्रीवादळात सुरक्षित स्थळी चक्रीवादळामध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रशासनाने येथील स. ह. केळकर महाविद्यालय देवगड या इमारतीमध्ये आनंदवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर केले. यावेळी तेथे निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. रुग्णवाहिका अग्निशमन दल आधी सहभागी झाले होते. डॉक्टरांचे पथक सामील झाले होते. महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी सहभागी होते. दुपारी उशिरा या कार्यक्रमाचा समारोप समारोप झाला. यावेळी तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आनंदवाडी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.