कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा
त. भा. प्रतिनिधी
पणजी : औषध कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांना लागू केलेला ‘एस्मा’ (अत्यावश्यक सेवा कायदा) रद्द करावा, 5 वर्षे कंत्राटी सेवा झालेल्या सरकारी खाती व कदंब महामंडळातील सर्वांना नोकरीत कायम करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे ठराव आयटक कामगार संघटनेच्या गोवा राज्य अधिवेशनातून संमत करण्यात आले.
पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये काल रविवारी आयटकचे अधिवेशन झाले. कंत्राटी सेवा पद्धत बंद करावी, सार्वजनिक बांधकाम खात्यामधील लेबर सप्लाय सोसायटीमार्फत घेतलेल्या सर्व कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तातडीने नियमित सेवेत घ्यावे, कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक वाहनचालकांना पगार वाढ देण्यात यावी, नदी परिवहन खात्यामधील कर्मचाऱ्यांना जादा कामाचे वाढीव वेतन मिळाले पाहिजे, पंचायत कर्मचारी वर्गास सातवा वेतन आयोग लागू करावा, असे विविध 15 ठराव सदर अधिवेशनात मांडण्यात आले आणि त्यास सर्वांनी आवाजी मतदानाने मान्यता दिली.
अधिवेशनात सर्वप्रथम ‘आयटक’च्या ध्वजाचे रोहण करण्यात आले आणि अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवंगत झालेल्या विविध मान्यवर, कामगार आणि इतरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आत्मराम गांवस यांनी जोरदार भाषण करुन ‘आयटक’चे कौतुक केले. मग कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. पुढील काळाकरीता गोवा राज्य समिती नेमण्यात आली. त्यात सरचिटणीस म्हणून ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पुन्हा नेमणूक करण्यात आली तर अध्यक्ष म्हणून प्रसन्न उटगी यांची नियुक्ती झाली. राजू मंगेशकर व सुहास नाईक यांना उपसरचिटणीस पद देण्यात आले.