सर्व्हरडाऊनमुळे नोंदणीचे काम ठप्प
उपनोंदणी कार्यालयांतील प्रकार
बेळगाव : नोंदणी व मुद्रांक खात्यातील कावेरी 2.0 स्वॉफ्टवेअर पुन्हा बंद पडल्याने नेंदणीचे काम ठप्प झाले आहे. सिटीझन लॉगीन सुरू केल्यास सर्व रजिस्टार लॉगीन बंद पडत आहे. हे लॉगीन दुरुस्त केल्यास सिटीझन लॉगीन बंद पडत आहे. असा प्रकार वारंवार होत असल्याने कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकही त्रस्त झाले आहेत. शनिवारी राज्यातील 252 उपनेंदणी कार्यालयांपैकी 122 कार्यालयात दस्ताऐवजाची नेंदणी शून्य झाली आहे. सोमवार दि. 3 रोजी सकाळी कार्यालयीन वेळेला सुरुवात झाल्यानंतरही अशीच परिस्थिती होती. कावेरी 2.0 सॉफ्टवेअरमध्ये दोष दिसून येत आहे. स्थावर मालमत्तेची नेंदणी ई-खात्यावर नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आल्यापासून सॉफ्टवेअरमध्ये दोष वाढले आहेत.
दस्ताऐवज अपलोड करण्यासाठी सिटीझन लॉगीन ओपन होत नाही. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरणे शक्य होत नाही. यापूर्वी अपलोड केलेल्या स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजाच्या नोंदणीसाठी नागरिक स्लॉट घेण्यासाठी व शुल्क भरणा करण्यासाठी पेमेंट गेटवे ओपन होत नसल्याची तक्रार होती. राज्यात प्रतिदिनी सरासरी 7 ते 8 हजार दस्ताऐवजांची नोंदणी होत होती. त्याचबरोबर दररोज किमान 40 ते 90 कोटी रुपये महसूल संग्रह होत होता. पण आता कावेरी 2.0 सॉफ्टवेअर अधुनमधून बंद पडत असल्याने दस्ताऐवजाची नोंदणी वेळेवर होत नाही. याचा परिणाम महसुलावर होत आहे. कावेरी 1.0 स्वॉफ्टवेअरची जबाबदारी सीडॉक कंपनीकडे 20 वर्षापर्यंत होती. 2023 मध्ये कावेरी 2.0 स्वाफ्टवेअरची जबाबदारी सीएमएस कंपनीने घेतली आहे. मात्र सरकाकडून कंपन्यांना निधी वितरणास विलंब होत असल्याने सर्व्हर डाऊन करण्यात येत असल्याची चर्चा उपनोंदणी कार्यालयातून दबक्या आवाजात सुरू आहे.