For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदीप घोष याची नोंदणी रद्द

07:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
संदीप घोष याची नोंदणी रद्द
Advertisement

पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष याचे डॉक्टर प्रमाणपत्र आणि नोंदणी रद्द करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने घेतला आहे. त्याला या प्रकरणात सीबीआयने अटक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या सूचीतून त्याचे नाव काढून टाकण्यात आले आहे. डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्याचे त्याचे अनुमतीपत्रही पश्चिम बंगाल वैद्यकीय कायद्याच्या विविध तरतुदींच्या अंतर्गत रद्द करण्यात आले आहे. ही कारवाई करण्यापूर्वी त्याला नियमानुसार 13 दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्याच्यावर अशी कठोर कारवाई करण्याची सूचना पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलला भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) पश्चिम बंगाल शाखेने केली होती. घोष याने संघटनेने पाठविलेल्या नोटीसला पूर्वनिर्धारित वेळेत उत्तर न दिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

Advertisement

डॉक्टरांचा संप सुरुच

महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण आणि राज्य सरकारच्या ढिलाईच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टर करत असलेले आंदोलन अद्यापही सुरुच आहे. न्याय मिळेपर्यंत ते थांबविण्यात येणार नाही, असे या डॉक्टरांच्या संघटनांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनकर्त्या डॉक्टरांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली असून राज्य सरकारने डॉक्टरांच्या बऱ्याच मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य सरकारवर आमचा विश्वास राहिला नसून प्रत्यक्ष काही परिवर्तन दिसून येत नाही, तो पर्यंत आंदोलन होतच राहील, असे या डॉक्टरांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.

तर आमची कन्या वाचली असती...

आर. जी. कर महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष याच्याविरोधात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे आरोप पूर्वीपासूनच होत होते. त्याचवेळी त्याच्या विरोधात कठोर कारवाई करुन त्याला पदावरुन काढून टाकण्यात आले असते, तर आमची कन्या वाचली असती. तथापि, पश्चिम बंगाल सरकारने त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आम्ही कन्या गमावली, असे भावूक प्रतिपादन बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या पित्याने गुरुवारी पत्रकारांसमोर केले. 9 ऑगस्टला या महाविद्यालयाच्या विश्रांती कक्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सीबीआयने 3 आरोपींना अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.