For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराज्य वाहनांची नोंदणी

10:32 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरराज्य वाहनांची नोंदणी
Advertisement

बेळगावातही बीएच सिरीजमध्ये 301 वाहने नोंद

Advertisement

बेळगाव : नोकरी-व्यवसायानिमित्त विविध राज्यांमध्ये रहिवासी असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वाहनांसाठी भारत सिरीज म्हणजेच बीएच सिरीज देण्यात येते. यामुळे इतर राज्यांमध्ये ये-जा करणे या वाहनांसाठी सोयीचे ठरते. वाहनाचे रजिस्ट्रेशन करतानाच बीएच सिरीजमध्ये नोंदणी करावी लागते. बेळगाव प्रादेशिक परिवहन विभागामध्ये मागील वर्षभरात 301 वाहनांना बीएच सिरीज देण्यात आली आहे. केंद्रीय विभागाचे कर्मचारी, सैन्य दलातील जवान, राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी, अधिकारी यांसह आयकर विभाग, जीएसटी, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण यासह इतर विभागांतील कर्मचाऱ्यांच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदल्या होत असतात. बरेच व्यापारी तीन-चार राज्यांमध्ये व्यापारानिमित्त वर्षभर फिरत असतात. अशा वाहनांना इतर राज्यांत अडविले जाते. परराज्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्तकाळ थांबायचे असेल तर त्या राज्यातील परिवहन विभागाकडे नोंदणी करावी लागते. यासाठी वाहनचालकांना वेगळे शुल्क भरावे लागते.

वाहनचालकाचा वेळ व पैसा या प्रक्रियेमध्ये वाया जातो. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2021 पासून बीएच सिरीज उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या राज्याच्या सिरीजऐवजी त्या वाहनाला बीएच सिरीज क्रमांक दिला जातो. ज्या वाहनचालकांना बीएच सिरीजमध्ये नोंदणी करायची असेल त्यांना रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ओळखपत्र, शासकीय अथवा खासगी कंपनीत कार्यरत असल्याचा पुरावा व शुल्क भरल्यानंतर वाहनाला बीएच सिरीज दिली जाते. बेळगावमध्ये सैन्यदलाचे प्रमुख तळ असल्याने अनेक अधिकाऱ्यांची बीएच सिरीजची वाहने दिसून येतात. बेळगाव प्रादेशिक परिवहन विभागात 115 मोटारसायकल व स्कूटरची नोंदणी बीएच सिरीजमध्ये झाली आहे. तर 186 चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.