‘रूग्णाला देव माना’...
‘आरोग्यम् धन संपदा’ या सुविचारातच आपणास आरोग्याचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे समजते. ज्याप्रमाणे धन अर्थातच पैसे यास मनुष्य अतिशय महत्त्व देतो, त्यापेक्षा जास्त महत्त्व आरोग्यास आहे. कारण आरोग्य चांगले असेल तरच मनुष्य सुखी जीवनाचा उपभोग घेऊ शकतो. आणि जेव्हा आरोग्याची समस्या निर्माण होते, तेव्हा इस्पितळात जाण्यावाचून पर्याय नसतो. इस्पितळातील डॉक्टर, परिचारीका तसेच इतर कर्मचारी हे रूग्णांसाठी देवासमान असतात.
गोव्यातील सरकारी इस्पितळाचा कारभार व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून केल्या जातात. अशाच प्रकारच्या तक्रारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पर्यंत पोचल्या. खुद्द आमदाराने लेखी स्वरूपात तक्रार केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात अचानक भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. येथील कारभार पाहून ते प्रचंड भडकले. त्यांना कारवाईचा बडगा उचलावा लागला व तिघांना निलंबित करण्यात आले. आरोग्यमंत्री श्री. राणे येथील डॉक्टर, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांना सज्जड इशारा तर दिलाच तसेच ‘रूग्णांना देव माना’ असे येथील कर्मचाऱ्यांना सांगण्यासही ते विसरले नाहीत.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा ऊग्णालयातील दोन ऊग्णवाहिका चालक आणि एका प्रमुखाला निलंबित करण्याचे निर्देश दिले. आरोग्यमंत्र्यांनी स्वता ऊग्णालयाची अचानक तपासणी केली. ऊग्णवाहिका चालक जाणूनबुजून वाहनांचे नुकसान करतात, रजा घेतात आणि घरीच राहतात ज्यामुळे आपत्कालीन सेवेवर परिणाम होतो असे आरोग्यमंत्री म्हणाले. ऊग्णवाहिकांची कमतरता असल्याचेही त्यांनी मान्य केले. राज्यातील सर्व ऊग्णवाहिका आणि शववाहिका सेवा 108 च्या कक्षेत आणण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत आरोग्य सेवा शतपटीने चांगली आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. म्हणूनच तर शेजारील राज्यातील रूग्ण देखील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात. सरकारने आरोग्य सेवा प्राधान्य दिलेय, वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या अनेक सुविधा ही पुरविलेल्या आहेत. आगामी काळात आणखीन सुविधा उपलब्ध होतील. मात्र, रूग्णालयांनी काम करणारे कर्मचारी कर्तव्यास कसूर करतात. त्यामुळे तक्रारींना वाव मिळत असतो.
काणकोण ते पेडणे व वास्को ते वाळपई पर्यंत सरकारने रूग्णालये निर्माण केलेली आहेत. त्या ठिकाणी डॉक्टर, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केलीय. पण, काही ठिकाणी डॉक्टर, परिचारीका व इतर कर्मचारी कामाच्या ठिकाणी जात नाहीत किंवा ते रूग्णांसाठी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी असतात. तर काही कर्मचारी आपल्याला राजकीय आशीर्वाद असल्याचे सांगून मनमानी करतात. अशावेळी खऱ्या अर्थाने फटका बसतो तो रूग्णांना.
रूग्ण इस्पितळांमध्ये येतात म्हणूनच तर डॉक्टर, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक सरकारने केलीय. सरकारी नोकरी मिळाली म्हणूनच रूग्णांना देव माना असे विधान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना करावे लागलेय.
गोमेको तर आज महत्त्वाचे इस्पितळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक सुधारणा झालेल्या आहेत व बदलत्या काळानुसार अत्याधुनिक सुविधांची भर पडत आहे. तज्ञ डॉक्टर व अनुभवी कर्मचारी वर्ग असल्याने अनेक रूग्णांना याठिकाणी दिलासा मिळत असतो. मात्र, या ठिकाणी जरा सुद्धा काही घडले तर त्याची चर्चा संपूर्ण गोव्यात होत असते.
आरोग्यमंत्र्यांनी उत्तर गोवा जिल्हा ऊग्णालयाबरोबरच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी अधुन मधून अशीच अचानक भेट देत रहावी अशी मागणी आता रूग्ण तसेच सर्व सामान्य जनतेकडून होत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीमुळे आरोग्यसेवेत अधिक तत्परता येईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. हल्ली आरोग्यमंत्री विश्वजीत राणे जाहीर कार्यक्रमातून आपल्या घरात निर्माण झालेल्या आरोग्य समस्यावर बोलतात व आरोग्य सेवा किती महत्वाची आहे हे सर्वांना पटवून देण्याचे काम करतात. इस्पितळात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका तसेच इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी किती महत्वाची आहे यावरही ते भाष्य करतात.
आरोग्यमंत्र्यांनी स्वता रूग्णालयाची तपासणी केल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीस आल्या. खाजगी ऊग्णवाहिका कार्यरत आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्याच बरोबर बंद असलेले सीटी स्कॅन मशीन लवकरच बदलले जाईल. ऊग्णालयात डायलिसिस सेंटर चालवणाऱ्या अपेक्स किडनी केअरला सल्लागारांनी ऊग्णालयात वारंवार भेट द्यावी आणि ऊग्णांना ब्लँकेटसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिलेत.
महेश कोनेकर