कोलकाता बलात्कार प्रकरण हस्तांतरित करण्यास नकार
डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी राज्यांकडून मागवल्या सूचना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुऊवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयच्या अद्ययावत स्थिती अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यात उत्तर मागितले आहे. याशिवाय या प्रकरणाची सुनावणी अन्य कोणत्याही राज्यात हस्तांतरित करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेशी संबंधित याचिकेवरही गुरुवारी काही वेळ युक्तिवाद झाला. याप्रसंगी केंद्र सरकारने नॅशनल टास्क फोर्सचा (एनटीएफ) अहवाल दाखल केल्याची माहिती एका वकिलाने न्यायालयाला दिली.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एनटीएफ अहवालाची प्रत या खटल्याशी संबंधित सर्व वकिलांना, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्याचे निर्देश दिले. यानंतर सर्व याचिकाकर्ते आणि राज्यांच्या मुख्य सचिवांनी यावर आपल्या सूचना द्याव्यात. त्यासाठी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने बलात्कार आणि हत्येचा मुख्य आरोपी संजय रॉयवर आरोप निश्चित केले होते. पुढील आठवड्यात सोमवार, 11 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत एनटीएफच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. नॅशनल टास्क फोर्सने दोन श्रेणींमध्ये शिफारसी तयार केल्या असून आता सुधारित निर्देशानुसार न्यायालयाने एनटीएफकडे डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत 3 आठवड्यांच्या आत सूचना मागवल्या आहेत.