For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एससीओ घोषणापत्रावर स्वाक्षरीस नकार

07:05 AM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
एससीओ घोषणापत्रावर स्वाक्षरीस नकार
Advertisement

पाकिस्तानी दहशतवादाचा मुद्दा टाळल्याने भारताची ठाम भूमिका, अखेर बारगळले घोषणापत्र

Advertisement

वृत्तसंस्था/क्विंगदाओ (चीन)

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा टाळल्याने भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेच्या संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची परिषद चीनमधील क्विंगदाओ येथे आयोजित करण्यात आली होती. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग या परिषदेला उपस्थित होते. त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने अखेर संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध न करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. परिषदेची समाप्ती संयुक्त घोषणापत्राविनाच झाली. हे भारताचे मुत्सद्दी यश मानले जात आहे.

Advertisement

परिषदेच्या प्रस्तावित संयुक्त घोषणापत्रात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्याला बगल देण्यात आली होती. मात्र, बलुचिस्तानातील बंडखोरीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला होता. पहलगाम येथे 22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्याचा उल्लेख मात्र टाळण्यात आला होता. पाकिस्तानला झुकते माप देण्याच्या या पक्षपाती भूमिकेचा निषेध आणि भारताच्या योग्य मुद्द्यांना घोषणापत्रात स्थान न दिले जाणे, या दोन कारणांमुळे भारताने या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या चिंताकडे दुर्लक्ष

प्रस्तावित घोषणापत्रात दहशतवाद आणि विभागीय सुरक्षा स्वातंत्र्य यासंबंधी भारताच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या दोन मुद्द्यांवर कोणतीही तडजोड भारत स्वीकारणार नाही, असे राजनाथसिंग यांनी निक्षून सांगितले होते. यामुळे भारताने जर या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली असती, तर भारताने स्वत:चीच भूमिका सौम्य केल्यासारखे झाले असते. भारताने स्वाक्षरी करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने या मुद्द्यांवरचा भारताचा ठामपणा दिसून आला आहे.

पाकिस्तानला झोडपले

दहशतवाद आणि स्थानिक सुरक्षा या मुद्द्यांवर या परिषदेत राजनाथसिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच झोडपून काढले. त्यांच्या भाषणाच्या वेळी पाकिस्ताचे  संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ उपस्थित होते. दहशतवादासंबंधात शून्य सहनशक्ती या भारताच्या धोरणाचा पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तानस्थित लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेच्या भारतातील दहशतवादी कारवाया आणि पहलगाम हल्ला या संदर्भांमध्ये त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीकेची झोड उठविली.

दहशतवाद हे त्यांचे धोरण

दहशतवाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा आणि सामरिक धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटना पोसल्या असून तेथील लष्कराचे या संघटनांना पाठबळ आहे. त्यामुळे भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला केवळ दहशतवादी संघटनाच नव्हे, तर पाकिस्तानचे लष्कर आणि पाकिस्तानचे प्रशासनही जबाबदार आहे. त्यामुळे आम्ही यापुढे पाकिस्तानला त्याच्याच भाषेत पण त्याच्याही पेक्षा अधिक जोरदार प्रत्युत्तर देणार आहोत. आमचे संरक्षण करण्याचा आम्हाला आधिकार आहे, असे प्रतिपादन सिंग यांनी केले.

चीनचाच अजेंडा

यावेळच्या एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचा कार्यक्रम चीननेच ठरविला होता, हे स्पष्ट आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर नेहमीच पाकिस्तानची बाजू सावरण्याचे काम चीन करत आला आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय संस्थेत किंवा व्यासपीठावर चीनने पाकिस्तानच्या दहशतवादाची पाठराखण केली आहे. भारताने प्रत्येकवेळी चीनला यामागचा धोका समजून दिला आहे. तरीही चीनची वर्तणूक आहे तशीच राहिल्याने भारताने आता पाकिस्तानविरोधात स्वबळावर कठोर धोरण अवलंबिण्यास प्रारंभ केला असून भारताला अनेक देशांचे समर्थन मिळत आहे.

Advertisement
Tags :

.