पंजाबमधील स्थानिक निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील पंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानाला स्थगिती देण्यास मंगळवारी नकार दिला. पंचायत निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजल्यापासुन सुरू असलेल्या मतदानाला स्थगिती दिली तर अराजकता निर्माण होण्याचा धोका असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
भविष्यात अशाच प्रकारे लोकसभा निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करू शकतो. आम्ही याप्रकरणाला लिस्ट करतो, परंतु मतदानावर कुठल्याही प्रकारे स्थगितीचा आदेश दिला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात एकाच परिवाराच्या सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या वॉर्डमध्ये आल्याने आणि एनओसीप्रकरणी सुमारे 1 हजाराहून अधिक याचिका दाखल झाल्या होत्या. परंतु न्यायालयाने सर्व याचिका फेटाळत पंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने 270 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर असलेली स्थगिती हटविली होती. परंतु न्यायालयाने निवडणुकीच्या व्हिडिओग्राफीची मागणी मान्य केली होती.