मथुरेतील मशिदीला ‘वादग्रस्त’ घोषित करण्यास नकार
उच्च न्यायालयाचा हिंदू पक्षाला धक्का : शाही ईदगाह मशिदीला ‘विवादित संरचना’ म्हणून घोषित करण्यासंबंधी याचिका फेटाळली
► वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील शाही ईदगाह मशीद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीला ‘वादग्रस्त संरचना’ म्हणून घोषित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे हिंदू पक्षाला धक्का बसला आहे. न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. हिंदू पक्षातर्फे महेंद्र प्रताप सिंह यांच्या वकिलांनी मशिदीला वादग्रस्त संरचना म्हणून घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादाशी संबंधित सुरू असलेल्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी भविष्यातील सर्व कार्यवाहीत शाही ईदगाह मशीद ऐवजी ‘विवादित रचना’ हा शब्द वापरावा अशी विनंती करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठाने हा अर्ज तूर्तास फेटाळला जात असल्याचे जाहीर केले. मूळ खटला क्रमांक 13/2023 मध्ये अॅड. महेंद्र प्रताप सिंह यांनी हा अर्ज दाखल केला होता, ज्याला खटला क्रमांक 07/2023 च्या वादींसह इतर अनेक पक्षांनीही पाठिंबा दिला होता.
अलाहाबाद उच्च न्यायालयात मथुरा शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणात शुक्रवारी होणाऱ्या निर्णयावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याचदरम्यान न्यायालयाने हिंदू पक्षाला धक्का देणारी याचिका फेटाळली आहे. यामध्ये मशिदीला वादग्रस्त संरचना म्हणून घोषित करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. हिंदू पक्षकार महेंद्र प्रताप सिंह यांनी जुने संदर्भ देताना तेथे पूर्वी एक मंदिर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या न्यायालयात या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला होता. याप्रसंगी सर्व हिंदू पक्षांनी महेंद्र प्रताप सिंह यांच्या युक्तिवादांना पाठिंबा दिला होता. या वादाशी संबंधित 18 खटले सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यात श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर संकुलातील कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.